बिलोली- कर्जबाजारीपणा तसेच सततच्या नापिकीमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या मिनकी येथील शेतकरी पिता-पुत्राने ९ जानेवारीला सकाळी नऊ वाजता स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार (वय ४३) व ओमकार राजेंद्र पैलवार (१६) असे मृत पिता-पुत्राचे नावे आहेत.
तालुक्यातील मिनकी येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र पैलवार यांना दोन एकर जमीन आहे. त्या शेतावर चार लाखांचे कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँक (खतगाव) या शाखेकडून घेतले होते. शेतावरील कर्ज व सततची होत असलेली नापिकी, यामुळे मुलाच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा याची चिंता होती. याबाबत सतत घरात आर्थिक ताणतणाव असायचा. त्यांचा मुलगा ओमकार हा उदगीर येथे शिक्षणास होता.
मुलगा ओमकार हा संक्रांतीनिमित्त गावाकडे आला होता. त्याने ८ जानेवारीला वडिलांना नवीन कपडे व शालेय साहित्य तसेच नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी पैशांची मागणी केली परंतु वडिलांनी त्यांना पैसे नाहीत, थोडे दिवस थांब, नंतर घेऊन देतो, असे सांगितले. त्यामुळे मुलगा नाराज झाला. वडिलांनी पैसे दिले नाहीत म्हणून त्याने बुधवारी रात्रीच्या वेळेस त्यांच्या शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा घरी नसल्याचे पाहून वडील राजेंद्र पैलवार गुरुवारी सकाळी शोधाशोध करत शेताकडे गेले तेव्हा शेतातील लिंबाच्या झाडाला मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते पाहताच वडिलांनीसुद्धा मुलाने गळफास घेतलेला दोरखंड सोडून त्याच दोरखंडाने, त्याच झाडाला गळफास घेऊन स्वतः ची जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.