नांदेड: जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात उत्पादित केलेल्या खते, बियाण्यांची नांदेडमार्गे मराठवाड्यात आवक होत आहे. महाराष्ट्रात मान्यता नसलेल्या बियाण्यांची विक्री नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केली जात आहे. विशेष म्हणजे कपाशीचे लागवड क्षेत्र अधिक असल्याने या सीमावर्ती राज्यातून आणि गुजरात, मध्य प्रदेशातून नांदेडात कपाशीचे बियाणे विविध नावे दाखल झाले आहे. काही स्थानिक व्यापारी अन् अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण व्यवहारातून हे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. कृषी विभागाकडून मागणी केली, त्याप्रमाणे खते आणि बियाण्यांचा साठा उपलब्ध होत आहे.
दरम्यान, डीएपीचा तुटवडा असून, येत्या दोन दिवसांत रॅक उपलब्ध होईल, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. परंतु, उपलब्ध युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी आणि कपाशीच्या विविध बियाण्यांचा नांदेडात काही व्यापारी जाणीवपूर्वक कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. मागणी असलेली खते, बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगून बडे व्यापारी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या माथी गुजराज, मध्य प्रदेश आणि कर्नाटक, तेलंगणा राज्यांतून आलेले कपाशीचे बियाणे मारत आहेत. नांदेड शहरातील काही बडे व्यापारी गुजरात, आंध्र व तेलंगणातील वितरकांशी संगनमत करून बियाण्यांची नावे व लेबल बदलून तीच बियाणे व खते मराठवाड्यात वेगळ्या नावे विक्री करीत आहेत. त्यात नांदेडच्या नवीन मोंढ्यातील काही बड्या अन् नामवंत व्यापाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना शोधून काढून बोगस बियाण्यांचे रॅकेट सक्रियरीत्या चालविणाऱ्या दुकानदारांसह त्यांना मदत करणाऱ्या काही पुढाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान कृषी विभागासमोर आहे. उगमशक्ती व उत्पादन क्षमता कमी असलेले बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. भविष्यात त्यातून उत्पादन निघणार नाही, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. त्यामुळे अशा बोगसगिरीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.
व्यापाऱ्यांकडून कृत्रिम तुटवडाकृषी विभागाच्या रेकॉर्डनुसार नांदेड जिल्ह्याला लागेल एवढे कपाशीसह सोयाबीन, तूर, मुग, उडीद, आदीचे बियाणे आणि विविध प्रकारची खते उपलब्ध आहेत. तसेच मागणी तसा टप्प्याटप्प्याने पुरवठा होत आहे. मात्र, काही व्यापारी शेतकऱ्यांना खते, बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगत या कंपनीचा नंबर एक माल आहे, अमूक बियाणे चांगले आहे असे भासवून शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत. मागणीप्रमाणे बियाण्यांचा साठा उपलब्ध नसल्याचे सांगत कृत्रिम तुटवडा निर्माण करीत आहे. या पार्श्वभूमीवर, काही व्यापाऱ्यांकडून कमी दर्जाची बियाणे शेतकऱ्यांना लादली जात असल्याच्या तक्रारी आहेत.
भरारी पथके १७ अन् कारवाया दोनखते, बियाण्यांचा काळा बाजार रोखण्यासाठी तालुकापातळीवर प्रत्येकी एक आणि जिल्हा पातळीवर एक असे एकूण १७ पथके कार्यान्वित करण्यात आले आहेत. परंतु, या पथकांकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. सीमावर्ती भागात शिवणी आणि हिमायतनगर येथे कारवाई वगळता इतर कुठेही छापा मारलेला अथवा कारवाई केलेले ऐकिवात नाही. त्यामुळे सदर पथके आहेत, तरी कुठे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बियाणे अन् खते मुबलक प्रमाणातकृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात खरिपासाठी लागणारी खते, बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. यामध्ये मका, तूर, मुग, उडीद, खरीप, ज्वारी, भुईमूग, तीळ या पिकांचे बियाणे प्रस्तावित केले तेवढा पुरवठा करण्यात आला आहे. त्याचबरोबर कपाशीचे १० लाख ५० हजार पॅकिटे प्रस्तावित असून, आजपर्यंत १० लाख ५८ हजार पाकिटांचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच सोयाबीनचे बियाणे १ लाख १९ हजार ४४ क्विंटलची मागणी असून, ९९ हजार ८ क्विंटल बियाणे उपलब्ध करून पुरवठा करण्यात आला आहे.