महामारीतील कोविड योद्धे कार्यमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST2021-06-06T04:14:35+5:302021-06-06T04:14:35+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेने आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे काढले होते. रुग्णसंख्या कमी असतानाही बेड न मिळणे, ऑक्सिजनचा तुटवडा, अपुरे मनुष्यबळ यामुळे ...

महामारीतील कोविड योद्धे कार्यमुक्त
कोरोनाच्या पहिल्या लाटेने आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे काढले होते. रुग्णसंख्या कमी असतानाही बेड न मिळणे, ऑक्सिजनचा तुटवडा, अपुरे मनुष्यबळ यामुळे उपलब्ध डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यानंतर कंत्राटी पद्धतीने जिल्ह्यात एक हजारावर डॉक्टर, परिचारिका आणि वॉर्डबॉयची भरती करण्यात आली होती; परंतु पहिली लाट ओसरताच त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर पहिल्यापेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक आली. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती. दुसरी लाट चांगलीच अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा घाईघाईने कंत्राटी भरती करण्यात आली. कंत्राटी असलेल्या या डॉक्टर, परिचारिका आणि वॉर्डबॉयनी जीव धोक्यात घालून गेल्या सहा महिन्यांपासून रुग्ण सेवेसाठी स्वत:ला झोकून दिले होते; परंतु आता दुसरी लाट ओसरताच पुन्हा त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. एकट्या जिल्हा रुग्णालयांतर्गत जवळपास ७०० जणांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पहिल्या लाटेचा अनुभव वाईट असताना दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा तोच कित्ता गिरविण्यात आला आहे. विशेष म्हणजे तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे दुर्दैवाने तिसरी लाट आल्यास पुनश्च हरिओम झाल्याचे पहावयास मिळू शकते; परंतु या सर्व प्रकारांत संबंधित कंत्राटी डॉक्टर, परिचारिका यांच्यासह रुग्णांचीही हेळसांड होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका पूर्णपणे जात नाही तोपर्यंत तरी कंत्राटींना कायम ठेवण्याची गरज आहे.