आठवीतील विद्यार्थ्यांने दोघांना वाचविले; एकजण बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 02:50 IST2020-02-23T02:50:31+5:302020-02-23T02:50:54+5:30
मानार नदीच्या घाटावर शनिवारी दुपारी आंघोळ करण्यासाठी गेलेले तीन शाळकरी मुले पाण्यात बुडू लागली.

आठवीतील विद्यार्थ्यांने दोघांना वाचविले; एकजण बुडाला
कंधार / बहाद्दरपुरा (जि. नांदेड) : मानार नदीच्या घाटावर शनिवारी दुपारी आंघोळ करण्यासाठी गेलेले तीन शाळकरी मुले पाण्यात बुडू लागली. आठवीतील कामेश्वर जगन्नाथ वाघमारे (घोडजकर) हा तिघांच्या मदतीला धावला. यातील आदित्य कोंडिबा दुंडे (१६) व गजानन विश्वनाथ श्रीमंगले (१६) या दोघांना त्याने मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले, तर ओम विजय मठपती (१६) हा बुडून मरण पावला.
घोडज येथे प्रसिद्ध ऋषी महाराज मंदिर येथे शनिवारी दुपारी कंधार येथील मनोविकास माध्यमिक शाळेतील दहावीत शिकत असलेले ओम विजय मठपत्ती, आदित्य कोंडिबा दुंडे व गजानन विश्वनाथ श्रीमंगले हे तिघे दर्शनासाठी गेले होते. तिघेही मानार नदीवरील धोबीघाटावर आंघोळ करून दर्शनाला जाणार होते. नदीपात्रातील पाणी पायऱ्यापर्यंत आलेले होते. तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. तिघेही बुडत असताना झालेला आवाज कामेश्वरच्या कानावर पडला. त्याने धाडसाने दोघांना वाचवले. परंतु ओम विजय मठपती या मुलाला वाचविण्यात अपयश आले.