जिल्ह्यासाठी हवी तेवढी लस - खा. चिखलीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:18 IST2021-04-20T04:18:38+5:302021-04-20T04:18:38+5:30
राज्यासह जिल्ह्यात सद्यस्थितीला कोरोना लसीवरुन महाविकास आघाडीचे नेते लसीचा राज्यातील पुरवठा होत नाही किंवा लस पुरवठा करताना केंद्र शासनाकडून ...

जिल्ह्यासाठी हवी तेवढी लस - खा. चिखलीकर
राज्यासह जिल्ह्यात सद्यस्थितीला कोरोना लसीवरुन महाविकास आघाडीचे नेते लसीचा राज्यातील पुरवठा होत नाही किंवा लस पुरवठा करताना केंद्र शासनाकडून भेदभाव केल्याचा आरोप केला जात आहे. याच आरोपात किती तथ्य आहे. हे पाहण्यासाठी नांदेडचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन व आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव तथा कोविड व्हॅक्सिन मेडिशीनचे प्रभारी प्रदीप हलदर यांच्याशी संवाद साधत लस उपलब्धी बाबत माहिती जाणून घेतली. यावेळी हलदर यांनी महाराष्ट्राला व नांदेड जिल्ह्यास लागेल तेवढी लस देण्यास कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली असल्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले. व्हॅक्सिन लसी संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजीराव शिंदे यांच्याशी देखील चर्चा करुन माहिती घेतली.
जिल्ह्याला लसीची कमतरता भासू नये यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांच्याशी खा. चिखलीकर यांनी संवाद साधला आहे. यामुळे राज्य व नांदेड जिल्ह्याला लागेल तेवढी लस उपलब्ध होणार आहे. नांदेडच्या नागरिकांनी कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन खा. चिखलीकर यांनी केली आहे. राज्य व नांदेड जिल्ह्याला अधिकची लस मिळावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या प्रयत्न बद्दल खा. चिखलीकर यांनी आभार मानले आहेत.