राहेर ते लोहगाव फाटा राज्य महामार्गावर धुळीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST2020-12-29T04:16:02+5:302020-12-29T04:16:02+5:30

रस्त्यानजीक गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात वाहनधारक व पादचारी यांचा प्रवास झाला कठीण राहेर : नायगाव तालुक्यातील राहेर ते बिलोली ...

Dust kingdom on Raher to Lohgaon Fata state highway | राहेर ते लोहगाव फाटा राज्य महामार्गावर धुळीचे साम्राज्य

राहेर ते लोहगाव फाटा राज्य महामार्गावर धुळीचे साम्राज्य

रस्त्यानजीक गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात

वाहनधारक व पादचारी यांचा प्रवास झाला कठीण

राहेर : नायगाव तालुक्यातील राहेर ते बिलोली तालुक्यातील लोहगाव फाटा राज्य महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून, या कामामुळे रस्त्यावरील मातीचे, धुळीचे लोट हवेत पसरत असल्याने वाहनधारकांना व पादचारी यांना प्रवास करणे कठीण झाले असून, रस्त्यानजीक गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी या भागातील लोकांनी सकाळ, सायंकाळ रस्त्यावर पाणी शिंपडण्याची मागणी शासन व कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीकडे केली आहे.

उमरी ते लोहगाव फाटा या २५१ राज्य महामार्गावरील राहेर ते मुस्तापूर या महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर असून सदर काम कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी करत आहे. मोठ्या प्रमाणात मुरूम, गिट्टी, डांबरमिश्रित गिट्टीची वाहतूक सदरील कंपनीच्या हायवा, टिप्पर, ट्रक या जड वाहनाने रात्रंदिवस होत आहे. तद्वतच महामंडळाच्या बस, ऑटो, काळीपिवळी, दुचाकी, मालवाहू ट्रक आदी वाहनांचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने हवेत धुळीचे प्रचंड लोट पसरत आहेत. अतिशय संथगतीने काम चालू असल्याने वाहतूक खोळंबत आहे. मोठी वाहने साइड देण्याच्या नादात रस्ता सोडून जात असल्याने अपघात घडत आहेत. अलीकडे नुकतेच उसाने भरलेला एक ट्रक नालीत कोसळल्याने ट्रक मालकाचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. या महामार्गावरील दुगाव, कुंभारगाव, गागलेगाव, इकळीमोर, मुस्तापूर आदी गावांतील लोकांना व तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना या धुळीस सामोरे जावे लागत आहे. त्यातच या कंपनीच्या बेजबाबदार कामाने शेतकऱ्यांचे रबी मोसमातील पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. संबंधिताचे यांच्यावर नियंत्रण नसल्याची खंत या भागातील जनतेने व्यक्त केली आहे. शासनाने लक्ष घालून सदर कंपनीकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी चेअरमन प्रकाश पाटील हिवराळे, शिवराज पोलीस पाटील, गणपती मालीपाटील, माधव हिवराळे, पाटील पहिलवान, सुरेश हिवराळे, व्यंकटराव जाधव, माधव नरवाडे, सखाराम गुरुजी नरवाडे, मधुकर हिवराळे, गोविंद शिंदे, गजानन दावरशेटीवार आदींसह या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. धुळीमुळे प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने रस्त्यावर सकाळ व सायंकाळ पाणी शिंपडण्याची मागणी होत आहे.

Web Title: Dust kingdom on Raher to Lohgaon Fata state highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.