जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची आज निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:17 IST2021-04-16T04:17:04+5:302021-04-16T04:17:04+5:30
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या समर्थ सहकारी पॅनेलने जिल्हा बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकल्या आहेत. ...

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची आज निवड
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या समर्थ सहकारी पॅनेलने जिल्हा बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक १२ जागा जिंकल्या असून, शिवसेनेला १, तर राष्ट्रवादीचे चार उमेदवार विजयी झालेले आहेत. भाजपचा या निवडणुकीत सुपडासाफ झाला. त्यांना अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले होते. निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. सर्वाधिक जागा जिंकलेल्या काँग्रेसकडे अध्यक्षपद, तर चार जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपाध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून माजी आ. वसंतराव चव्हाण यांचे नाव पुढे असून, तीन वेळेस आमदार राहिलेल्या चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे चार उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यात जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांचाही समावेश आहे. त्यामुळे भोसीकर यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १६ एप्रिलला दुपारी साडेबारा वाजता नवनियुक्त संचालक मंडळाची बैठक बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्हा उपनिबंधक जाधव यांची या बैठकीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.