नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी विविध विभागात फेऱ्या माराव्या लागतात. काही कार्यालय तालुका व जिल्हा मुख्यालयी असतात. नागरिकांची कामे मंडळस्तरावरच मार्गी लावण्यासाठी व शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दर शुक्रवारी विविध विभागाचे अधिकारी मंडळस्तरावर पोहोचून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न जाणून घेतील. नांदेड तालुक्यातील शहर मंडळात मालटेकडी रोडवरील फेमस हॉल येथे उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महसूल विभाग, महापालिका, आरोग्य विभाग, भूमिअभिलेख, तालुका कृषी अधिकारी, महिला व बालविकास, सहा. निबंधक संस्था, पशुधन विकास, राज्य विद्युत मंडळ आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी आपल्या विभागाच्या योजनांसह उपस्थित होते. यावेळी नांदेड शहर मंडळातील नागरिकांनी वेगवेगळ्या समस्यांसाठी अर्ज केले, अशा ४११ अर्जांपैकी ३०६ अर्जांचा निपटारा करण्यात आला. यावेळी संध्याताई कल्याणकर, नगरसेवक शेर अली, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, विजयकुमार पाटे, मरळे, मंडळ अधिकारी अनिरुद्ध जोंघळे, रवी पल्लेवाड, कविता इंगळे आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात प्रशासन आपल्या गावी उपक्रमास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST