पाणी विरतणाचे नियोजन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST2021-06-05T04:14:06+5:302021-06-05T04:14:06+5:30
फिजिकल डिस्टन्सचे बाजारात उल्लंघन नांदेड - शहरातील बाजारपेठ परिसरात फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. दुपारी २ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ...

पाणी विरतणाचे नियोजन विस्कळीत
फिजिकल डिस्टन्सचे बाजारात उल्लंघन
नांदेड - शहरातील बाजारपेठ परिसरात फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. दुपारी २ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने याभागात मोठी गर्दी होत आहे. नागरिक कोरोनाचे नियम पाळण्यास तयार नाहीत. प्रशासनही कारवाई करीत नसल्याचे दिसते. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
बाराहाळी परिसरातील गावे अंधारात
बाराहाळी - महावितरण कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे परिसरातील गावात वारंवार वीज खंडित होत आहे. सुमारे ४० गावातील नागरिकांना वीज वितरणच्या मनमानीला सामोरे जावे लागत आहे. थ्री फेज वीजपुरवठा कधी रात्री तर कधी दिवसा सुरू राहतो. दिवसभरातून २० ते २५ वेळा खंडित होत असतो, अशा तक्रारी आहेत.
यादीत नावे समाविष्ट करा
भोकर - तालुक्यात २०२० मध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असतानाही भोकर तालुक्यातील मातूळ मंडळातील अनेक शेतकऱ्यांची नावे यादीत आली नाहीत. या यादीत ती नावे समाविष्ट करावीत अशी मागणी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. निवेदनावर तालुकाध्यक्ष सुनील कांबळे, महासचिव बालाजी अनंतवाड, नागोराव शेंडगे, उपाध्यक्ष संतोष आणेराये, आनंद एडके, सुभाष तेले आदींची नावे आहेत.
खल्लाळ यांच्या भेटी
धर्माबाद - उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी शहरातील विविध बँकांना भेटी देऊन अधिकाऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. येताळा येथील एसबीआय, धर्माबाद येथील एसबीआय, महाराष्ट्र बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आदींना खल्लाळ यांनी भेटी दिल्या. यावेळी तहसीलदार दत्तात्रय शिंदे, मंडळ अधिकारी नामदेव माळोदे, तलाठी महादेव बासरे उपस्थित होते.
मिर्झापुरे यांचा सत्कार
बिलोली - अर्जापूर येथील रहिवासी तथा ग्रामीण बँक कुंडलवाडी शाखेचे कर्मचारी पेंटाजी मिर्झापुरे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा एका कार्यक्रमात सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाखाधिकारी अब्दुल वाजीद, योगेश चटक, शुभम होमने, संतोष पाटील, नजीर शेख, प्रल्हाद पाटील, लक्ष्मण मोरे, बालाजी एमेकर, साहेबराव मिर्झापुरे, संदीप मिर्झापुरे आदी उपस्थित होते.
फडणवीस यांची भेट
लोहा - तालुक्यातील पीक विम्यासाठी मन्याड फाउंडेशनचे एकनाथ पवार यांनी नांदेड येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले. शासनाने पीक विम्यासंदर्भात अर्थसहाय्य करावे या मागणीचे निवेदन पवार यांनी फडणवीस यांना दिले.
विजेच्या खांबाचे नुकसान
मांडवी - मांडवी परिसरात मंगळवारी रात्री वादळी वाऱ्याने काही गावातील झाडे उन्मळून पडली. तसेच विजांच्या खांबाचे नुकसान झाले. मांडवी येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून प्रत्येक गावात वीजपुरवठा केला जातो. वीज वितरणने ही लाईन दुरुस्त केली असून वीजपुरवठा सुरू आहे. अनेक सिमेंट खांब तुटून पडले. त्यामुळे पेरणीसाठी अडचण निर्माण झाली आहे.
आर्थिक मदतीचा धनादेश
नायगाव - तालुक्यातील वजीरगाव येथील शेतकरी आनंद ढगे यांचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना १३ एप्रिल रोजी घडली होती. शासनाकडून सानुग्रह अनुदानाचा ४ लाखांचा धनादेश आ. राजेश पवार यांच्या हस्ते ढगे यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला. यावेळी तहसीलदार गजानन शिंदे, तलाठी शिंगेनवाड, सरपंच, नागरिक उपस्थित होते.
पाण्यासाठी नागरिकांचे हाल
किनवट - सारखणी येथील डीपी जळाल्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. नवीन रोहित्र बसविण्याची मागणी केली जात आहे. नवीन डीपी भोकर येथून आणावी लागेल अशी माहिती सहाय्यक अभियंत्यांनी गावकऱ्यांना दिली. दरम्यान, डीपी कोठूनही आणा मात्र आमची समस्या सोडवा अशी मागणी सारखणीकर करीत आहेत.
नागरिकांना मास्कचे वाटप
किनवट - पळशी ग्रामपंचायतच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी जी.व्ही.कोटरंगे, सरपंच प्रदीप चव्हाण, माजी सरपंच मनोज पुसनाके, विश्वास पाटील, गणेश सोनुले, रमेश जेंगठे, प्रफुल्ल राठोड आदी उपस्थित होते.
महसूल विभागाकडून पाहणी
बिलोली - तालुक्यातील आदमपूर येथील गायरान जमिनीतील गाव तलावाची महसूल विभागाकडून पाहणी करण्यात आली. सध्या गाव तलावात काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. या संदर्भातील तक्रार आदमपूर येथील संजय हलबुर्गे यांनी केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन महसूल विभागाने पाहणी केली. यावेळी तलाठी शेख महंमद सलीम, मंडळ अधिकारी आर. पी. शेख उपस्थित होते.
शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारात
हदगाव - शासकीय मदत व पतपुरवठा होत नसल्याने शेतकरी पुन्हा सावकारांच्या दारात उभा राहिला आहे. बँकही कर्ज देण्यास नकार देत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी खासगी सावकारांच्या दारात जात असल्याचे दिसून येते.
अध्यक्षपदी सुरेखा निदानकर
धर्माबाद - ग्राम संवाद सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेखा निदानकर यांची निवड झाली. ही निवड प्रदेशाध्यक्ष अजिनाथ धामणे यांनी केली. या निवडीबद्दल निदानकर यांचे अनेकांनी स्वागत केले.
न्या. शेख यांचा सत्कार
भोकर - येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायमूर्ती मुजीब शेख यांची बदली झाल्याबद्दल त्यांना पत्रकारांच्या वतीने सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. अहमदनगर येथे न्या. शेख यांची बदली झाली. यावेळी अनेक पत्रकारांची उपस्थिती होती.
धान्याचे मोफत वाटप
हदगाव - तालुक्यातील लोणी येथे मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत धान्याचे वाटप करण्यात आले. प्रति युनिट ३ किलो गहू व २ किलो तांदूळ दिला जात आहे. मोफत धान्य हे अंत्योदय व ऑनलाईन नोंद असलेल्या लाभार्थ्यांना दिले जात आहे.