कोरोना पॉझिटिव्हला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह, उच्चदाब सर्वात पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:13 IST2021-04-29T04:13:45+5:302021-04-29T04:13:45+5:30
नांदेड : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. रुग्णवाढीबरोबरच मृत्यूचा आलेखही वाढताच आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनाची धसकी घेतली ...

कोरोना पॉझिटिव्हला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह, उच्चदाब सर्वात पुढे
नांदेड : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. रुग्णवाढीबरोबरच मृत्यूचा आलेखही वाढताच आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनाची धसकी घेतली आहे. अशातही मृत्यू पावणाऱ्यांमध्ये आता वयोवृद्धांसोबत तरुणांचा समावेश दिसून येत आहे. त्यातही मधुमेह आणि उच्चदाब असलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हे आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. वेळीच उपचार घेतल्यास मधुमेह, उच्चदाब असलेले अनेक रुग्ण ठणठणीतही झाले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्यू पावणाऱ्यांमध्ये वयोवृद्धांचाही अधिक समावेश होता. त्यातही मधुमेह आणि उच्च दाब असणारे रुग्ण होते. परंतु दुसऱ्या लाटेत ज्या तरुणांना हे आजार आहेत. त्यांचाही कोरोनामुळे बळी गेल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात तब्बल ६८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील ४०० हून अधिक जणांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता. तर काही जणांना इतर लिव्हर, किडनी यासारखे इतर आजार होते. अशा रुग्णांची प्रकृती ठणठणीत होण्यासाठी बऱ्याच दिवसांचा कालावधी जातो. परंतु त्यांना धोकाही सर्वाधिक असतो. मधुमेह असल्यामुळे अशा रुग्णांच्या खाण्यापिण्यावरही बरीच बंधने असतात. तसेच इतर रुग्णांना दिली जाणारी औषधे या रुग्णांना लागू पडतील की नाही? याचीही चाचपणी डॉक्टरांना करावी लागते. परंतु मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी वेळीच रुग्णालय गाठून योग्य उपचार घेतल्यास आजारातून बरे झाल्याची हजारो उदाहरणे आहेत.