कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:51+5:302021-05-28T04:14:51+5:30
लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून रेल्वेगाड्या तसेच बससेवा बंद आहे. रेल्वेत कुरकुरे, गोळ्या, बिस्किटे, खेळणी विकून पोट भरणाऱ्या अंध व्यक्तींना आता ...

कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार
लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून रेल्वेगाड्या तसेच बससेवा बंद आहे. रेल्वेत कुरकुरे, गोळ्या, बिस्किटे, खेळणी विकून पोट भरणाऱ्या अंध व्यक्तींना आता दुसरा कोणताही मार्ग उरला नाही. कोणी मदत करण्यासही आता पुढे येत नाहीत. अशावेळी शासनाची मदतही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अंध व्यक्तींना जगण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
आधारही एकमेकांचाच
चौकट-१. लॉकडाऊन काळात बाहेर पडता येत नाही. घर चालविणे अवघड झाले आहे. सुरुवातीला काहीजणांनी मदत केली होती. मात्र, आता कोणी मदतही करण्यास तयार नाही. जेवढे जमविले होते, त्यावरच आतापर्यंत घर चालविले आहे. यापुढे जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. - सोनुले हदगावकर, जयभीमनगर, नांदेड.
२. वर्षभरापासून दिव्यांगांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मी पदवीधर असतानाही शासन मला कंत्राटीस्तरावर नोकरी देण्यास टाळाटाळ करत आहे. दोन वेळेस उपोषण केले. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आता तर कोरोनामुळे बाहेर पडता येत नाही. कुटुंबाला कसे जगवायचे हा प्रश्न आहे. - गणेश वर्षेवार, भोकर.
३. लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद आहेत. त्यामुळे आमच्यासारख्यांचे जगणे अवघड झाले आहे. कोरोनाचे संकट आणखी किती दिवस राहणार हेसुद्धा माहीत नाही. त्यामुळे कसे जागावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. - बाबाराव हंबर्डे, नांदेड.
चौकट- कोरोना काळात शासनाने दिव्यांगांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे आवश्यक होते. मात्र, दिव्यांगांसाठी योग्य नियोजन केले नाही. निराधारांचा पगार एक महिना अगोदर देऊन त्यालाच १ हजारांची मदत घोषित केली. शासनाने याव्यतिरिक्त अर्थसाहाय करणे आवश्यक आहे. - राहुल साळवे, अध्यक्ष, बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती, नांदेड.