खुल्या बाजारात कापसाचे भाव वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:18 IST2021-02-13T04:18:10+5:302021-02-13T04:18:10+5:30
मागील वीस पंचवीस दिवसांपासून खुल्या बाजारात कापसाची मागणी वाढल्याने व खुल्या बाजारात कापसाला चांगला भाव मिळत असल्याने सीसीआयचे किनवट ...

खुल्या बाजारात कापसाचे भाव वधारले
मागील वीस पंचवीस दिवसांपासून खुल्या बाजारात कापसाची मागणी वाढल्याने व खुल्या बाजारात कापसाला चांगला भाव मिळत असल्याने सीसीआयचे किनवट तालुक्यातील चिखलीफाटा येथील खरेदी केंद्र ओस पडले त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सीसीआयऐवजी खासगी व्यापाऱ्यांना कापसाची विक्री केली.सर्वप्रथम कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू केली. तेव्हा ६ हजार ८१२ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली. नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना एसएमएस पाठवले, त्यातील ९५३ शेतकऱ्यांनी २६ हजार ५८६ क्विंटल ४० किलो कापूस विक्री केला. सीसीआयने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून एम. एच. कॉटेज जिनिंग चिखलीफाटा येथे जेव्हा कापूस खरेदी सुरू केली तेव्हा सीसीआयचे भाव ५ हजार ६०० ते ५ हजार ७०० रुपये चांगले मिळत असल्याने सीसीआयच्या खरेदी केंद्रावर मोठी गर्दी पाहावयास मिळाली; मात्र वीस-पंचवीस दिवसांपासून खुल्या बाजारात कापसाला ५ हजार ७०० ते ५ हजार ८०० रुपये चांगला भाव मिळत असल्याने व सीसीआयचा कापसाचा चुकारा वेळेत मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी सीसीआयच्या खरेदी केंद्राकडे पाठ फिरवत खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकणे पसंद केल्याने सीसीआयला ऑनलाईन नोंदणीच्या तुलनेत केवळ चौदा टक्केच कापूस खरेदी करता आला.
झालेली नोंदणी, आलेला शेतकऱ्यांचा कापूस पाहता ५ हजार ८५९ शेतकऱ्यांनी सीसीआयच्या खरेदीकडे पाठ फिरवली, म्हटल्यास वावगे ठरू नये. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रवि तिरमनवार यांना विचारले असता सीसीआयची खरेदी बंद असून ऑनलाइन नोंदणी केलेल्या ६ हजार ८१२ कापूस उत्पादक शेतकऱ्यांपैकी ९५३ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा २६ हजार ५८६ क्विंटल ४० किलो कापूस खरेदी केला, असे त्यांनी सांगितले