नसबंदीवरील खर्च पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:17 IST2021-01-22T04:17:19+5:302021-01-22T04:17:19+5:30
नांदेड : शहर व परिसरात मोकाट तसेच भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला असताना महापालिका प्रशासन मात्र झोपेतच आहे. तरोडा नाका, ...

नसबंदीवरील खर्च पाण्यात
नांदेड : शहर व परिसरात मोकाट तसेच भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला असताना महापालिका प्रशासन मात्र झोपेतच आहे. तरोडा नाका, काैठा, सिडको, शिवाजीनगर, नई आबादी, आनंदनगर, शारदानगर आदी परिसरात शेकडो मोकाट कुत्रे असून, त्यावर कुणाचाही अंकुश नाही.
शहरातील मोकाट, भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये म्हणून त्यांची नसबंदी करण्यासाठी लाखो रुपये खर्च केला जातो. परंतु, प्रत्यक्षात नसबंदी किती श्वानांची केली आणि किती खर्च झाला, यासंदर्भात माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे या नसबंदीच्या खर्चात गडबड असल्याचा संशय निर्माण होत आहे.
कागदोपत्री कामांमुळे श्वानांच्या संख्येत वाढ
महापालिकेच्यावतीने मोकाट श्वानांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. तरोडा भागात पूर्वी तीस ते चाळीस श्वान होते. आजघडीला या रस्त्यावर दीडशेहून अधिक भटके कुत्रे असून, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथील कुत्र्यांची संख्या वाढण्यास येथील मटन, चिकन दुकानेही कारणीभूत आहेत.
शहरातील तरोडा नाका येथे असलेल्या मांसाहारी बाजारामुळे या भागात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट असल्याचे दिसून येते. या भागात कुत्र्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याच्या घटना नित्याच्याच आहेत.
मोकाट श्वान पकडण्याचे काम बंदच
शहरातील मोकाट श्वान पकडण्याचे कंत्राट सध्या कोणीही घेतलेले नाही. कोरोनामुळे हे काम बंद होते. सदर कंत्राट लवकरच निघेल.
- डाॅ. मोहम्मद रईसोद्दीन वैद्यकीय अधिकारी
महिन्याकाठी आठ ते दहा तक्रारी
शहरातील भटक्या, मोकाट कुत्र्यांचा त्रास होत असल्याबाबत तसेच चावा घेतल्याने बंदोबस्त करण्यात यावा, अशा महिन्याकाठी आठ ते दहा तक्रारी येत असल्याचे सांगण्यात आले.