coronavirus : नांदेडवर परभणी, हिंगोली, यवतमाळच्याही रुग्णांचा भार; यंत्रणा करीत आहे प्रयत्नांची पराकाष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 07:23 PM2020-09-15T19:23:45+5:302020-09-15T19:24:09+5:30

जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रूग्णांचे प्रमाण हे २० ते २५ टक्के इतके झाले आहे.

coronavirus: load of patients from Parbhani, Hingoli, Yavatmal on Nanded; The system is doing its best | coronavirus : नांदेडवर परभणी, हिंगोली, यवतमाळच्याही रुग्णांचा भार; यंत्रणा करीत आहे प्रयत्नांची पराकाष्ठा

coronavirus : नांदेडवर परभणी, हिंगोली, यवतमाळच्याही रुग्णांचा भार; यंत्रणा करीत आहे प्रयत्नांची पराकाष्ठा

Next
ठळक मुद्देमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न

- अनुराग पोवळे

नांदेड : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ११ हजार ५०० हून अधिक झाल्याने संपूर्ण वैद्यकीय यंत्रणेवर ताण आला आहे. जिल्ह्यात शासकीय रूग्णालयासह खाजगी रूग्णालयातही रूग्णांना बेड मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहे. या सर्व बाबीत  शासकीय रूग्णालयावर नांदेडसह हिंगोली, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यातील रूग्णांचाही भार पडत आहे. 

या परिस्थितीत आणि उपलब्ध मनुष्यबळातच रूग्णसेवा देताना यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रूग्णांचे प्रमाण हे २० ते २५ टक्के इतके झाले आहे. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत विष्णूपुरी येथे शासकीय रूग्णालय, जिल्हा रूग्णालय, मुखेड उपजिल्हा रूग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय यासह कोविड केअर सेंटर जिल्हा आणि तालुकास्तरावर कार्यान्वित करण्यात आले आहेत. या ठिकाणी ४ हजार २०० बेडची उपलब्धता करण्यात आली होती. मात्र झपाट्याने वाढणारे रूग्ण आणि नांदेडसह हिंगोली, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यातून येणारेरूग्ण पाहता आरोग्य यंत्रणेवरील ताण अधिकच वाढत आहे. कोविड केअर सेंटरमध्ये लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांवर उपचार केले जास्त आहेत.

जिल्हास्तरावर आयुर्वेद रूग्णालय आणि गुरूगोविंदसिंघजी स्मारक रूग्णालयासह तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर कार्यान्वित आहेत. तीव्र लक्षणे असलेल्या रूग्णांना         डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहे. जिल्ह्यात विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. याठिकाणी अतिगंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी १७० बेड होते. त्यामध्ये आता आणखी ८० अत्याधुनिक बेडची भर पडली आहे. ४ सेन्ट्रल मॉनिटरिंग सिस्टीम असलेल्या वार्डात गंभीर रूग्णांवर लक्ष ठेवता येणार आहे. आॅक्सिजनसह व्हेंटीलेटरची उपलब्धताही करण्यात आल्याचे     शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी सांगितले. शासकीय रूग्णालयात गंभीर रूग्णांसाठी २५० हे बेड रूग्णांना उपलब्ध करून दिले जात असल्याचेही ते म्हणाले.  

शासकीय रूग्णालयात आता १० केएल क्षमतेचे तीन आॅक्सीजन संचही बसवण्यात आले आहेत. रूग्णालयात मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहे. प्रतिदिन ३ ते ४ रूग्णांचा मृत्यू होत आहे. शासकीय रूग्णालयात अतिगंभीर रूग्णांना दाखल केले जाते. कोरोनाच्या चौथ्या स्टेजमध्ये गेलेल्या रूग्णांना वाचविण्यात  अपयश येत आहे. कोरोना लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार सुरू करण्याची गरज असते, मात्र काही रूग्ण हे लक्षणे आढळूनही अंगावर आजार काढत आहे. हीच बाब गंभीर होत असल्याचेही डॉ. देशमुख म्हणाले. कोरोनाचे विषाणू फुफ्फुसात गेल्यानंतर परिस्थिती गंभीर होत आहे.पण त्याचवेळी शासकीय रूग्णालयातून अनेक दररोज ५ ते १५ रूग्ण ठणठणीत होऊन घरीही जात आहेत. ही बाबही महत्वाची आहे.

अनेक कार्यरत डॉक्टर्सना कोरोनाची लागण झाली आहे. काही डॉक्टर्स हे ५५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटात आहेत. त्यांना वगळावे लागत आहे. काही महिला डॉक्टर्स, कर्मचारी यांना लहान बाळ असल्याने त्यांनाही कोरोना वॉर्डातील ड्यूटी नको असते. अशा या सर्व परिस्थितीतही रूग्णांना उपचार दिले जात आहेत. परभणी, हिंगोली जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने गंभीर रूग्णांना नांदेडला रेफर केले जात आहे.  अशा परिस्थितीत बेडची कमतरता निर्माण होत आहे. जिल्ह्याबाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांचे प्रमाण हे २० ते २५ टक्क्यांवर पोहोचले असल्याचे ते म्हणाले.

वेळप्रसंगी अन्य रुग्णालयेही ताब्यात घेतली जाणार - जिल्हाधिकारी
जिल्हा प्रशासनाने कोरोना उपाययोजनेअंतर्गत नांदेड शहरातील ग्लोबल हॉस्पिटल, यशोसाई हॉस्पिटल, अभ्युदय लाईफ केअर हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, नंदीग्राम हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल या ठिकाणीही ७७० बेडच्या क्षमतेचे कोविड हॉस्पिटल तयार करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात या रूग्णालयांपैकी केवळ अश्विनी हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहेत. इतर रूग्णालये कोरोना उपचारांपासून लांबच आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी वेळप्रसंगी ही रूग्णालयेही घेतली जातील, असे स्पष्ट केले.  सध्या बेडची उपलब्धता आहे. सर्वच रूग्णालये कोरोना हॉस्पिटल झाली तर इतर प्रकारच्या रूग्णांची गैरसोय होईल. या बाबीचाही प्रशासनाने विचार केला आहे. अनेक रूग्ण ताप आली तरी रूग्णालयात दाखल करून घ्या, असा आग्रह करीत असलल्याचे ते म्हणाले.

Web Title: coronavirus: load of patients from Parbhani, Hingoli, Yavatmal on Nanded; The system is doing its best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.