corona virus : 'शेतात राहण्यास गेले कोरोनामुक्त झाले; कोरोनामुक्तीचा भोसी पॅटर्न आता संपूर्ण नांदेड जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 18:39 IST2021-05-14T18:37:56+5:302021-05-14T18:39:50+5:30
corona virus : बाधितांना त्यांच्या शेतातच राहण्याची सोय करण्यात आली. ज्यांच्याकडे शेती नाही त्यांची सोय प्रकाश भोसीकर यांच्या शेतात शेडमध्ये करण्यात आली.

corona virus : 'शेतात राहण्यास गेले कोरोनामुक्त झाले; कोरोनामुक्तीचा भोसी पॅटर्न आता संपूर्ण नांदेड जिल्ह्यात
नांदेड : हॉटस्पॉट ठरलेल्या भोकर तालुक्यातील भोसी गावात ११९ कोरोनाबाधित रुग्ण शेतात राहून कोरोनामुक्त झाले. त्यानंतरच्या दीड महिन्यात गावात एकही कोरोनाबाधित आढळलेला नाही. कोरोनामुक्तीसाठी भोसी गावाने राबविलेला हा पॅटर्न ग्रामीण भागासाठी दिशादर्शक आहे. त्यामुळे हा पॅटर्न आता जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबविणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले.
भोकर तालुक्यातील भोसी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी कार्यकर्ती, वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेऊन ठाकूर यांनी ऑनलाइन संवाद साधला. या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख-भोसीकर, जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. यू. एम. डोंगरे आदींची उपस्थिती होती. दोन महिन्यांपूर्वी एका लग्नसोहळ्यानंतर भोसी येथे एकजण कोरोनाबाधित आढळला. त्यानंतर पाचजण बाधित आले. ग्रामस्थांनी कोरोनाची प्रचंड धास्ती घेतली होती. मात्र, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसीकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ग्रामस्थाचे समुपदेशन केले. कोरोना चाचणीनंतर तब्बल ११९ जण बाधित आढळलेे.
१५ दिवसांत ११९ कोरोनामुक्त, शेतात जाऊन औषध, जेवण पुरवले
बाधितांना त्यांच्या शेतातच राहण्याची सोय करण्यात आली. ज्यांच्याकडे शेती नाही त्यांची सोय प्रकाश भोसीकर यांच्या शेतात शेडमध्ये करण्यात आली. आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती यांनी दररोज शेतात जाऊन बाधितांशी संवाद साधून त्याच ठिकाणी औषधी व जेवण पुरविले. या उपक्रमामुळे पंधरा दिवसांत ११९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले. बाधित व्यक्ती गाव सोडून शेतात राहिल्यामुळे गावात कोरोना पसरू शकला नाही. या उपक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. यू. एम. डोंगरे यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. भोसी येथे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वय ठेवून जसा पॅटर्न राबविला तसाच पॅटर्न जिल्ह्यात राबविण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसीकर यांच्याकडून डॉ. बालाजी शिंदे यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती घेतली.