कोरोना होऊन गेला; इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यासाठी संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:23 IST2021-09-15T04:23:08+5:302021-09-15T04:23:08+5:30
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाची पहिली आणि आता दुसरी लाट ओसरत चालली आहे. त्यात हजारो जणांना कोरोनाची लागण झाली होती. ...

कोरोना होऊन गेला; इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यासाठी संभ्रम कायम
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाची पहिली आणि आता दुसरी लाट ओसरत चालली आहे. त्यात हजारो जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे इतर सर्वप्रकारच्या शस्त्रक्रिया या काळात बंदच होत्या. परंतु आता सर्व व्यवहार उघडले आहेत. कोरोनातून अनेकजण ठणठणीतही झाले आहेत. त्यामुळे इतर आजारांच्या शस्त्रक्रिया कधी करावयाच्या? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांनुसार कोरोनातून बरे झाल्यानंतर इतर कोणताही त्रास नसल्यास शस्त्रक्रिया करता येते. जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये तशा शस्त्रक्रिया सुरूही करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी तर शस्त्रक्रियेसाठी वेटिंग असल्याचे दिसून येते.
आजघडीला शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे; परंतु त्यातही वातावरणात झालेल्या बदलामुळे झालेल्या आजारांचे रुग्ण आहेत.
विष्णूपुरी येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अपघात किंवा इतर कारणांच्या अत्यावश्यक शस्त्रक्रिया तातडीने केल्या जातात. त्यासाठी वेटिंगवर ठेवले जात नाही.
कोरोनामुळे काही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. त्यासाठी रुग्णांना संपर्क साधला जातो. ठराविक दिवस देऊन त्यांना शस्त्रक्रियेसाठी बोलाविण्यात येते.
कोरोनामुळे इतर आजारांच्या रुग्णांवर परिणाम झाला होता. परंतु आता सर्व व्यवस्था जागेवर आली आहे. सर्वच आजारांच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे कुणाचीही गैरसोय नाही.
- डॉ. नीळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक