अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा विचार, अनेक प्रश्न अनुत्तरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST2021-05-15T04:17:06+5:302021-05-15T04:17:06+5:30
शिक्षक विभागाने नुकतेच राज्यातील मुख्याध्यापकांचे सर्वेक्षण करून दहावीच्या निकालासंदर्भात मते मागविली होती. यावेळी १७ हजार ४८७ मुख्याध्यापकांनी अंतर्गत मूल्यमापनाआधारे ...

अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा विचार, अनेक प्रश्न अनुत्तरित
शिक्षक विभागाने नुकतेच राज्यातील मुख्याध्यापकांचे सर्वेक्षण करून दहावीच्या निकालासंदर्भात मते मागविली होती. यावेळी १७ हजार ४८७ मुख्याध्यापकांनी अंतर्गत मूल्यमापनाआधारे निकाल जाहीर करावा, असे मत मांडले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे २३ एप्रिलपासून घेण्यात येणारी दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र आता दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देताना कोणते निकष वापरावेत, याविषयी चर्चा सुरू आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ११ वीच्या वर्गात प्रवेशासाठी गुण देण्यासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा घ्यावी काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व विषयाची मिळून एकत्रित एक पेपर विद्यार्थ्यांना द्यावा, त्यासाठी दोन तास वेळ दिला जाईल. ही परीक्षा जुलै किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळेच्या ठिकाणी घ्यावी, असे नियोजन केले जात आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांचे मते मागविण्यात आली होती. मात्र अद्यापही कोणताच निर्णय झाला नाही.
चौकट- कोरोनामुळे मागील शैक्षणिक वर्षात शाळा सुरूच झाल्या नाहीत. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना काही शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविला, परंतु काही शाळेत अडचणी आल्या. त्यामुळे या शाळेत ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविण्यात आला नाही.
ग्रामीण भागात ऑनलाईन अभ्यासक्रमात येणारे अडथळे व विद्यार्थ्यांकडे असलेल्या असुविधांमुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने मुख्याध्यापकांच्या केलेल्या सर्वेक्षणानंतर मूल्यमापनासाठी कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
चौकट-
शिक्षक, प्राचार्य म्हणतात
१. शाळास्तरावर ११ वी प्रवेशासाठी सीईटी हा एक पर्याय होऊ शकतो. त्यानुसार नियोजन केल्यास हा प्रश्न सुटेल. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कसा राहणार, यावरही बरेच अवलंबून आहे. कारण परीक्षा म्हटले की, शाळेत गर्दी होणार. त्यासाठी वेगळे नियोजन करावे लागणार. मुख्याध्यापक पवळे, श्री शिवाजी कॉलेज, माणिकनगर, नांदेड.
२. दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्षभर ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविला. मात्र ग्रामीण भागातील अनेक शाळेतील मुलांना अभ्यासक्रमाचा परिचयसुद्धा झाला नाही. अशावेळी ते कोणती परीक्षा कशी पद्धतीने देणार, हा एक प्रश्नच आहे. - राजेश टोम्पे, शिक्षक
३. दहावीच्या निकालासाठी कोणते निकष वापरणार, यावर ११ वीच्या प्रवेशाची प्रक्रिया अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने लवकर निर्णय घेऊन पालकांच्या मनातील गोंधळ थांबविला पाहिजे. कारण मुलांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले आहे. - बालाजी देशमुख , शिक्षक