छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेला काँग्रेसचे समर्थन- संजय लाखे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST2021-06-03T04:14:17+5:302021-06-03T04:14:17+5:30
संजय लाखे पाटील यांनी मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका मांडत असताना भाजप आणि फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. विनायक मेटेंच्या माध्यमातून ...

छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेला काँग्रेसचे समर्थन- संजय लाखे पाटील
संजय लाखे पाटील यांनी मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका मांडत असताना भाजप आणि फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. विनायक मेटेंच्या माध्यमातून समाजात असंतोष पसरविण्याचे काम देवेंद्र फडणवीसांनी सुरू केले आहे. त्यासाठी ते मेटेंना रसदही पुरवत आहेत. तसेच ग्रामीण भागात आरक्षणप्रश्नी गैरसमज पसरविण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. गायकवाड आयोगाला चुकीची माहिती पुरविणाऱ्या संस्थांची सखोल चौकशी करून त्या संस्था काळ्या यादीत टाकाव्यात तसेच याप्रकरणी लीड करणाऱ्या मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी संस्थेचा देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. आरक्षणप्रश्नी सर्वांना एकत्र घेऊन केंद्राकडे जावे, त्यासाठी फडणवीसांनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.
राजेंच्या भूमिकेचे स्वागत, सरकार मागण्याही मान्य करेल
खासदार छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणप्रश्नी घेतलेल्या भूमिकेचे संजय लाखे यांनी स्वागत केले. तसेच मराठा आरक्षणप्रश्नी चर्चा करण्यासाठी चारवेळा पंतप्रधानांकडे वेळ मागूनही त्यांना भेट दिली नाही. हा संबंध महाराष्ट्राचा छत्रपती घराण्याचा अपमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सर्व प्रकारचे अधिकार स्वत:कडे घेऊन मोदी हुकूमशहासारखे वागत असल्याची टीका लाखे पाटील यांनी केली. दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत राजेंच्या मागणीप्रमाणे कलम ३४२ अ नुसारच केंद्राने सहकार्य करावे, असे आवाहन केले. दरम्यान, ६ जूनपूर्वी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या तसेच खासदार संभाजीराजे यांनी केलेल्या संपूर्ण मागण्या पूर्ण केल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.