वैद्यकीय प्राध्यापकांचे आज सामूहिक रजा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:17 IST2021-04-15T04:17:17+5:302021-04-15T04:17:17+5:30
महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर असोसिएशन संघटनेने निवेदनात म्हटले की, सद्य:स्थितीत महाराष्ट्रातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सुमारे ४५० ते ५०० ...

वैद्यकीय प्राध्यापकांचे आज सामूहिक रजा आंदोलन
महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर असोसिएशन संघटनेने निवेदनात म्हटले की, सद्य:स्थितीत महाराष्ट्रातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सुमारे ४५० ते ५०० विभागीय निवड मंडळामार्फत नियुक्त असलेले सहायक प्राध्यापक कार्यरत आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट येत आहे. अशा परिस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असणारे सहायक प्राध्यापक जिवाची पर्वा न करता एक वर्षापासून फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन शासनाने आदेश काढून अस्थायी स्वरूपात कार्यरत असलेल्या सहायक प्राध्यापकांच्या सेवा नियमित केल्या होत्या. त्याच धर्तीवर सद्य परिस्थितीत कार्यरत असलेल्या अस्थायी स्वरूपातील सहायक प्राध्यापकांच्या सेवा नियमित करावी, गतवर्षी जून २०२० रोजी संचालकांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मीटिंगमध्ये घोषणा करण्यात आली होती की, सर्व अस्थायी सहायक प्राध्यापकांच्या सेवा नियमित करण्यात येतील, तसेच अधिष्ठाता यांच्यामार्फत संचालकांना सर्व अस्थायी प्राध्यापकांची माहिती पाठवून प्रक्रिया चालू करण्यात आली होती. मात्र निर्णय झाला नसल्यामुळे २ नोव्हेंबरपासून सामूहिक रजा आंदोलन केले होते. ५ नोव्हेंबर २०२० रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या दालनात झालेल्या बैठकीत असे मौखिक आश्वासन दिले की, परंतु कार्यवाही झाली नसल्याचे अस्थायी सहायक प्राध्यापकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १५ एप्रिल रोजी २४ तास सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवेदनावर डॉ. निशिकांत गोडपल्ले, डॉ. संज्योत गिरी, डॉ. राहुल परसोदे, डाॅ. मशरत फरदोस, डॉ. प्रशांत साबळे, डॉ.सुनील बोबले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.