कॉकटेल लसीमुळे अपेक्षित परिणाम होणार कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:12+5:302021-05-30T04:16:12+5:30
नांदेड जिल्ह्यात अशी घटना समोर आली नाही जिल्ह्यात कोरोना लसीचा पहिला डोस वेगळा आणि दुसरा वेगळा अशी घटना घडल्याचे ...

कॉकटेल लसीमुळे अपेक्षित परिणाम होणार कमी
नांदेड जिल्ह्यात अशी घटना समोर आली नाही
जिल्ह्यात कोरोना लसीचा पहिला डोस वेगळा आणि दुसरा वेगळा अशी घटना घडल्याचे अद्याप तरी समोर आले नाही. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणेकडून लसीकरण मोहीम अतिशय काळजीपूर्वक राबविली जात आहे. ज्यांनी जो पहिला डोस घेतला त्यांना दुसरा डोसही तोच देण्यात आला.
तज्ज्ञ डॉक्टर्स काय म्हणतात?
लसीचे वेगवेगळ्या कंपनीचे दोन डोस घेतल्यास संबंधिताच्या जीवितास धोका नाही. मात्र लस घेतल्यानंतर कोरोनापासून संरक्षण मिळण्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही. - डॉ. वाय.एच. चव्हाण
पहिला डोस कोविशिल्डचा आणि दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा असा प्रयोग झाल्याचे अद्याप समोर आले नाही. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम सांगता येणार नाहीत. ही बाब लस संशोधकांच्या अखत्यारीतील आहे. - डॉ. प्रशांत बारबिंड
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस ज्या कंपनीचा घेतला आहे त्याच कंपनीचा दुसरा डोस लसीकरण केंद्रावर देण्यात येत आहे. नागरिकांनीही ठरवून दिलेल्या वेळेत नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे. लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. त्याचे पालन करण्याची गरज आहे. जर चुकून वेगवेगळ्या कंपनीचे दोन डोस घेतले असल्यास संबंधितांच्या शरीरात अँटिबॉडीज कमी होण्याची शक्यता आहे. परंतु नांदेडात अद्याप तसा प्रकार घडला नाही. कर्मचारी प्रत्येकाला पहिला डोस कोणता घेतला याची तपासणी करूनच लसीकरण करतात. - डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्य चिकित्सक