नांदेड : ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या नांदेड शहराला आधुनिकतेची जोड देत विकासाच्या महामार्गावर नेण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यासाठीचा त्यांचा संकल्प काय आहे याची माहिती 'लोकमत'शी बोलताना फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शिख धर्माचे दहावे गुरू, श्री गुरु गोविंदसिंह महाराज यांचे नांदेडशी अतूट नाते आहे. हजूर साहिब गुरुद्वारामुळे नांदेड हे जगभरातील शीख बांधवांसाठी श्रद्धास्थान बनले आहे. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांमुळे नांदेडचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व अधिकच वाढले आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गानी नांदेड आज देशाशी जोडले गेले आहे. या सुविधा अधिक आधुनिक आणि अद्ययावत करण्यावर भर देण्यात येत असून नांदेड-जालना एक्सप्रेस वेच्या कामाला गती देण्यात आली आहे. शहराच्या मूलभूत सुविधांवर भर देत नांदेड महापालिकेने अनेक महत्त्वाची विकासकामे हाती घेतली आहेत. अमृत योजनेअंतर्गत शहराच्या पाणीपुरवठ्याची कामे अंतिम टप्प्यात असून, दीर्घकालीन आणि शाश्वत पाणीपुरवठ्याचा प्रश्न त्यामुळे सुटणार आहे. त्याचबरोबर सांडपाणी व मलनिस्सारणाच्या कामांनाही अमृत योजनेतून गती देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारण्यात आला असून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोगॅस आणि बायोमायनिंग प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या पेयजल सर्वेक्षणात नांदेड महापालिकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळणे, ही शहराच्या प्रशासनाची मोठी कामगिरी मानली जाते. रस्ते विकासाच्या बाबतीतही नांदेड शहराने मोठी झेप घेतली आहे. शहरातील ११५ रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे ९८ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून एकूण १०७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे वाहतूक सुलभ होण्यास मोठी मदत झाली आहे.
नव्याने समाविष्ट गावांचा नियोजनबद्ध विकासभविष्यातील विकासाचा विचार करता नांदेड महानगरपालिकेने स्पष्ट व्हिजन मांडले आहे. २००९ मध्ये झालेल्या हद्दवाढीत तरोडा खुर्द आणि तरोडा बुद्रुक या गावांचा समावेश झाला. या भागांच्या नियोजनबद्ध विकासावर भर देण्यात येणार आहे. महापालिकेच्या शाळा दर्जेदार पद्धतीने चालवल्या जात असून, त्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी अतिरिक्त निधी देण्याचा मानस आहे.
आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने पावलेशहराच्या मध्यभागी आलेली औद्योगिक वसाहत शहराबाहेर हलविण्याबाबत सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यावरही महापालिकेचा भर आहे. ऐतिहासिक नंदगिरी किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामास मंजुरी मिळाल्याने पर्यटनाच्या दृष्टीने नांदेडला नवी ओळख मिळणार आहे. महापालिका क्षेत्रात दहा उद्यानांचा विकास करण्यात येत असून, त्यासोबत सहा नवीन उद्याने विकसित करण्याचे नियोजन आहे. सौर ऊर्जेच्या वापरात महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. शुद्धीकरण प्रकल्पांसाठी उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांना विनाविलंब मान्यता देण्याचा निर्णय, तसेच मनपाच्या इमारतींवरील सौर प्रकल्पांमुळे होणारी वीज बचत ही उल्लेखनीय बाब आहे. शासनाकडून जीएसटी परतावा वाढवून मिळावा, यासाठीही पाठपुरावा सुरू आहे.
Web Summary : Chief Minister Devendra Fadnavis pledged modern development for Nanded, focusing on infrastructure, water supply, and waste management. Projects include the Nanded-Jalna Expressway, upgrades to municipal facilities, and renewable energy initiatives. Emphasis is on planned growth, improved healthcare, and tourism development around Nandgiri Fort.
Web Summary : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नांदेड़ के आधुनिक विकास का संकल्प लिया, जिसमें बुनियादी ढांचे, पानी की आपूर्ति और कचरा प्रबंधन पर ध्यान केंद्रित किया गया है। परियोजनाओं में नांदेड़-जालना एक्सप्रेसवे, नगरपालिका सुविधाओं का उन्नयन और नवीकरणीय ऊर्जा पहल शामिल हैं। नंदगिरी किले के आसपास नियोजित विकास, बेहतर स्वास्थ्य सेवा और पर्यटन विकास पर जोर दिया गया है।