पोलिसांच्या गणवेषावर आता बॉडी वॉर्न कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST2021-06-05T04:14:04+5:302021-06-05T04:14:04+5:30
पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे आणि मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या उपस्थितीत या कॅमेऱ्यांचे वाटप करण्यात आले. शहरात सेफ ...

पोलिसांच्या गणवेषावर आता बॉडी वॉर्न कॅमेरे
पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे आणि मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या उपस्थितीत या कॅमेऱ्यांचे वाटप करण्यात आले. शहरात सेफ सिटी प्रकल्पाअंतर्गत शंभराहून अधिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली यातील बहुतांश कॅमेरे हे बंदच राहतात. त्यामुळे पोलिसांची मोठी अडचण होते. त्यावर काही प्रमाणात का होईना बॉडी वॉर्न कॅमेऱ्यामुळे मदत होणार आहे.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी लॉकडाऊनच्या काळात नियम तोडणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाला सहकार्य करीत शहर वाहतूक शाखेच्या वजिराबाद पथकाने सहकार्य केले होते. वसूल केलेल्या या दंडातून काही रक्कम ही पोलिसांना उपयोगी असलेल्या साधनसामग्रीवर खर्च करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी पोलिसांसाठी प्रत्येकी २४ हजार २०० रुपये याप्रमाणे १२ बॉडी वॉर्न कॅमेरे खरेदी करून दिले. या कॅमेऱ्यांचे शुक्रवारी वाटप करण्यात आले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपअधीक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे, चंद्रसेन देशमुख, पो. नि.चंद्रशेखर कदम यांची उपस्थिती होती.
बॉडी वॉर्न कॅमेऱ्याचे फायदे
नागरिक आणि पोलिसांच्या कामात संभ्रम राहणार नाही. बेशिस्त व्यक्ती पोलिसांसोबत वाद घालत असल्यास त्याचे चित्रीकरण होईल. कायदा व सुव्यवस्था, महत्त्वाचे सण यावेळी बंदोबस्तात कामी येतील. तक्रारदार आणि ठाणे अंमलदार यांच्यात सुसंवाद राहील. या कॅमेऱ्यांद्वारे १५ मीटरपर्यंत चित्रीकरण करता येणार आहे. मेमरी १२८ जीबी असून ३६ मेगा पिक्सलच्या या कॅमेऱ्याद्वारे रात्रीच्या वेळी चित्रीकरण करता येणार आहे.