नांदेड नियोजनात वर्चस्वाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:55 PM2018-10-29T23:55:55+5:302018-10-29T23:59:37+5:30

बैठकीतनंतर काँग्रेस आ़ अमरनाथ राजूरकर आणि सेना आ़ हेमंत पाटील यांच्यातही बाचाबाची झाली़ यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़

Battle of Vermes in Nanded Planning | नांदेड नियोजनात वर्चस्वाची लढाई

नांदेड नियोजनात वर्चस्वाची लढाई

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेस-सेना हातघाईवरगोंधळामुळे गाजली ‘डीपीडीसी’ ची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्या नियोजन समितीची सोमवारची बैठक वादळी ठरली़ बैठकीत काँग्रेस आणि सेना पदाधिकाऱ्यांत विकासकामांच्या निधीवरुन वर्चस्वाची लढाई दिसून आली़ या गोंधळातच पालकमंत्री रामदास कदम यांनी बैठक संपल्याचे जाहीर केल्याने काँग्रेस पदाधिकारी संतापले़ विकासकामांवर चर्चा करावी, असा त्यांचा आग्रह होता़ बैठकीतनंतर काँग्रेस आ़ अमरनाथ राजूरकर आणि सेना आ़ हेमंत पाटील यांच्यातही बाचाबाची झाली़ यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत डीपीडीसीतील १२ कोटींच्या निधीचा मुद्दा कळीचा ठरला़ सदर निधीतून लोकप्रतिनिधींनी दिलेली कामेच घ्यावी़ यासाठी सर्वसमावेशक निर्णय व्हावा, असा आ़डी़पी़सावंत आणि आ़ अमरनाथ राजूरकर यांचा आग्रह होता़ तर निर्णय झाला आहे, पुन्हा तोच तो विषय काढू नका असे सांगत पालकमंत्री पुढील विषयाकडे वळत होते़ यातूनच सभागृहातील वातावरण पेटण्यास सुरुवात झाली़
धर्माबादसाठी १२ कोटींचा निधी शासनाकडून आणत आहात ते चांगलेच आहे़ मात्र मार्चपूर्वी तो निधी येण्याची गॅरंटी काय ? असा प्रश्न काँग्रेसकडून विचारला जात होता़ मात्र यावर पालकमंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही़ हा वाद वाढतच गेला़ काँग्रेस सदस्यांनी आमच्या अधिकारावर आपण गदा आणत असल्याचे सांगत, सदस्यांनी दिलेली कामेच घ्यावीत, असा आग्रह धरला़ याच गदारोळात पालकमंत्र्यांनी तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळांची घोषणा केली़ याबरोबरच विद्युत रोहित्रासाठी दिलेला प्रस्ताव मंजूर करीत याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देवून सभा संपल्याचे जाहीर केले़ पालकमंत्र्यांच्या या कृतीचा विरोध करीत सदस्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली़ पालकमंत्री गेले तरी आम्ही सभा पुढे चालवू, असे आव्हान सदस्यांनी दिल्यानंतर सभा चालवूनच दाखवा असे सांगत घोषणाबाजी करणाºया चार सदस्यांना निलंबित करण्याचे आदेश देवून पालकमंत्री रामदास कदम हे सभागृहाबाहेर पडले़ यावेळी काँग्रेससह इतर विरोधी सदस्यांनी या कृतीच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरु केली़ या गोंधळातच आ़अमरनाथ राजूरकर आणि आ़ हेमंत पाटील यांच्यात बाचाबाची झाली़ यावेळी पालकमंत्री रामदास कदम यांनी हस्तक्षेप करीत हा प्रकार खपवून घेणार नाही, असे सुनावले़ तर पालकमंत्री म्हणून चुकीचा पायंडा पाडत आहात़ जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे, सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे असा आग्रह आ़राजूरकर यांचा होता. या वादविवादानंतर पालकमंत्री कदम आणि आ़अमरनाथ राजूरकर यांच्यात बंद खोलीमध्ये चर्चा होवून पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पडले़


डीपीडीसी ही जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करुन जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे़ त्यामुळे या समितीच्या बैठका नियमित झाल्या पाहिजेत़ लोकनियुक्त पदाधिकाºयांची भूमिका लक्षात घेवून आराखडा तयार केला पाहिजे़ मात्र तसे होत नाही़ सभागृहात वारंवार सदस्यांना निलंबित करण्याची धमकी देवून निवडून आलेल्या सदस्यांचा अपमान करण्याचा प्रयोग पालकमंत्र्यांनी केला आहे़ त्यांचे आजचे वर्तन म्हणजे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होय. - आ़ डी़ पी़ सावंत

पालकमंत्र्यांवर अपशब्द वापरल्याचा आरोप
बैठकीत उमरी येथील नगरसेविका दीपाली मामीडवार यांनी सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा नसल्याने पाच गावे तेलंगणात जाण्याची मागणी करीत असल्याचे सांगताच पालकमंत्री संतापले़ महाराष्ट्राचा काही स्वाभिमान आहे की नाही ? सभागृहात राज्याचा अवमान सहन करणार नाही, अशा धमक्या देण्याऐवजी जायचे असेल तर खुशाल तेलंगणात जा, अशा शब्दात त्यांनी मामीडवार यांना सुनावले़ बैठकीनंतर याच विषयावरुन झालेल्या चर्चेदरम्यान पालकमंत्र्यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप आहे़ मात्र त्यांनी तो फेटाळला़

आपल्या इच्छेनुसार व सोयीनुसार नियोजन मंडळाची बैठक न झाल्यानेच काँग्रेस सदस्यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीत गोंधळ घातला़ मात्र , कुठलीही बेशिस्त आपण खपवून घेणार नाही, कुठल्याही महिलेचा अपमान केला नसून, आजही आपलीच सत्ता असल्यासारखे वागणा-या काँग्रेसला लगाम घालण्याचा प्रयत्न केला़ सभागृहात गोंधळ घालून काँग्रेस सदस्यच विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न करीत होते़ या गोंधळाला व दबावतंत्राला मी झुकलो नाही़ - रामदास कदम, पालकमंत्री

बैठक गुंडाळल्याने महत्त्वाचे मुद्दे बाजूला
नांदेड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री आणि आमदारांमध्ये गोंधळ उडाला़ त्यामुळे लगेचच बैठक गुंडाळल्याने महत्त्वाचे मुद्दे बैठकीत मांडता आले नसल्याची खंत मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ़ अशोक बेलखोडे यांनी व्यक्त केली़
नांदेड जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे़ बारावीपर्यंतचे शिक्षण घेईपर्यंत ५३ टक्के मुलींची शिक्षणातून गळती होते़ नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले़ आठवीपर्यंतची गळती २७ टक्के आहे तर जवळपास ५० टक्के मुली बारावीपर्यंत पोहोचत नाहीत़ या वयात मुलींचे लग्न म्हणजेच बालविवाह होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक असून बालविवाह व दुरावलेले शिक्षण या दोन्ही बाबी तिच्या आरोग्यावर परिणाम करतात़ त्यातून उद्भवणाºया अडचणी विकासाला अडसर ठरत आहेत़ त्यामुळे शासनाने त्यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डॉ़ बेलखोडे यांनी केली़ तालुका सोडून जिथे मुली शिक्षण घेतात तिथे सर्व जाती-धर्मातील मुलींसाठी वसतिगृह उभारावीत, त्यांच्या सुरक्षिततेसह योग्य सुविधा देवून शिक्षणातील मुलींची गळती थांबविण्याची मागणी डॉ़बेलखोडे यांनी केली़ तसेच मांडवी येथील खान अब्दुल गफार खान नेत्र रूग्णालयाच्या इमारत दुरूस्तीसाठी निधी मंजूर करावा, किनवट तालुक्यातील अतिदुर्गम गावे रस्त्यांना जोडण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, किनवट येथे शासकीय नर्सिंग स्कूल सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे़ त्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करावा, आदी मागण्या डॉ़ बेलखोडे यांनी केल्या़

Web Title: Battle of Vermes in Nanded Planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.