बारडची मॉडेल व्हिलेजकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:36 IST2018-02-01T00:32:06+5:302018-02-01T00:36:28+5:30
गावातील सर्व धार्मिक स्थळावरील कर्णकर्कश आवाज करणारे भोंगे काढण्याचा ग्रामसभेत एकमताने निर्णय घेऊन प्रकाशझोतात आलेल्या मुदखेड तालुक्यातील बारड ग्रामपंचायतने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे़ मंगळवारच्या निर्णयानंतर बुधवारी गावातील जवळपास सर्वच धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्यात आले होते़ त्याचबरोबर ग्रामपंचायतकडून राबविण्यात येणा-या नवनवीन उपक्रमामुळे या गावाची आता मॉडेल व्हिलेजकडे घोडदौड सुरु असल्याची चित्र पहावयास मिळाले़

बारडची मॉडेल व्हिलेजकडे वाटचाल
लोकमत न्यूज नेटवर्क
बारड : गावातील सर्व धार्मिक स्थळावरील कर्णकर्कश आवाज करणारे भोंगे काढण्याचा ग्रामसभेत एकमताने निर्णय घेऊन प्रकाशझोतात आलेल्या मुदखेड तालुक्यातील बारड ग्रामपंचायतने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे़ मंगळवारच्या निर्णयानंतर बुधवारी गावातील जवळपास सर्वच धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्यात आले होते़ त्याचबरोबर ग्रामपंचायतकडून राबविण्यात येणा-या नवनवीन उपक्रमामुळे या गावाची आता मॉडेल व्हिलेजकडे घोडदौड सुरु असल्याची चित्र पहावयास मिळाले़
मुदखेड तालुक्यातील बारड या गावाची लोकसंख्या जवळपास दहा हजारावऱ दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे गावाचा कायापालट झाला़ सत्ताधारी आणि विरोधक गावाच्या विकासासाठी गळ्यात गळे घालून कामाला लागत असल्याचे येथील उदाहरणही विरळच़ जवळपास वर्षभरापूर्वी ग्रामपंचायतने सर्व गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले़ त्यामुळे चोरी व इतर गुन्हेगारीच्या घटनांवर आळा बसला़ जिल्हा परिषद शाळा, आरोग्य केंद्र या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाºयांच्या हजेरीसाठी ग्रामपंचायतमध्ये बायोमेट्रीक बसविण्यात आले आहे़ त्यामुळे दांडीबहाद्दरांचा बंदोबस्त झाला़ रस्ते आणि स्वच्छतेची कामेही समाधानकारक़
सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदत असताना केवळ भोंग्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे दुधात मिठाचा खडा टाकण्याचे काम होत आहे़ गावात आठ मंदिरे, दोन बुद्धविहार आणि एक मशीद आहे़ या आवाजामुळे सर्वत्र गोंगाटाचे वातावरण निर्माण झाले होते़ ही बाब ग्रामपंचायत पदाधिकाºयांच्या लक्षात आली़ त्याचबरोबर शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणारा परिणाम ही बाबही त्यांना खटकत होती़ त्यानंतर पदाधिकारी व सदस्यांनी जवळपास दोन महिन्यांपासून गावातील सर्व समाजातील प्रतिनिधींच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली़ भोंग्याच्या आवाजामुळे होणारे दुष्पपरिणाम पटवून दिले़
ग्रामस्थांनाही त्यांचे म्हणणे पटले़ त्यानंतर ३० रोजी झालेल्या ग्रामसभेत सर्व धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब झाले़ निर्णयानंतर त्याच दिवशी धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्यास सुरुवात करण्यात आली़ बुधवारी दुपारपर्यंत जवळपास सर्वच धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्यात आले होते़ बारड ग्रामपंचायतने घेतलेला हा निर्णय इतर ग्रामपंचायतीसाठी आदर्श निर्माण करणारा आहे़
जि़प़शाळेचे उपमुख्याध्यापक बालाजी बोंडलेवार म्हणाले, भोंग्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे लक्ष राहत नव्हते़ परंतु धार्मिक बाब असल्यामुळे विरोधही करता येत नव्हता़ परंतु आता ग्रामपंचायतचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने लाभदायक आहे़ तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विशाल राऊत, दिव्या आठवले यांनी निर्णयाचे स्वागत करीत, आता अभ्यासात आवाजामुळे व्यत्यय येणार नसल्याचे सांगितले़
गावातून यापुढे कुठल्याही मिरवणुका काढावयाच्या असल्यास त्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे़