नांदेड : पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या नांदेडच्या मामी-भाचीचा ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ६ सप्टेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. या अपघातात मामी प्रतिभा आंबटवार (वय ३२) आणि भाची कादंबरी गादेकर (वय १८, दोघी रा. बळीरामपूर, ता. नांदेड) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
बळीरामपूर येथील कृष्णा आंबटवार हे भोसरी येथे एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. ते आपल्या पत्नी प्रतिभा आंबटवार व मुलीसह भोसरी येथे वास्तव्यास होते. ६ सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी प्रतिभा आणि तिची भाची कादंबरी गादेकर काही नातेवाईकांसोबत बाहेर पडल्या होत्या.
दरम्यान, विसर्जन मार्गावर असलेल्या एका टी पॉईंटजवळ एका ट्रकने वळण घेताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेच्या वेळी प्रतिभा आणि कादंबरी मधोमध सापडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले.
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी, ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता बळीरामपूर येथील स्मशानभूमीत दोघींवर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी नातेवाईक, ग्रामस्थ आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत वातावरण अत्यंत भावूक झाले होते.मयत प्रतिभा आंबटवार यांच्या मागे सात वर्षांची कृषी ही मुलगी आहे. एकाच वेळी दोन निष्पाप जीवांचा जाणे, त्यातही उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, ही अत्यंत दुर्दैवी बाब असून या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.