मुुदखेड तालुक्यात रॉकेल वाटपात अपहार
By Admin | Updated: May 31, 2014 00:29 IST2014-05-31T00:04:15+5:302014-05-31T00:29:26+5:30
नांदेड : तालुक्यातील शिधापत्रिका- धारकांना रॉकेल वाटप करीत असताना त्यांच्याकडे शिधापत्रिका असल्याची खात्री न करता व शिधापत्रिकेवर नोंदी न घेताच रॉकेलचे वाटप केले़

मुुदखेड तालुक्यात रॉकेल वाटपात अपहार
नांदेड : तालुक्यातील शिधापत्रिका- धारकांना रॉकेल वाटप करीत असताना त्यांच्याकडे शिधापत्रिका असल्याची खात्री न करता व शिधापत्रिकेवर नोंदी न घेताच रॉकेलचे वाटप केले़ ही माहिती माहिती अधिकारात समोर आली आहे़ जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात रॉकेल वाटपात अपहार करून त्याचा काळा बाजार केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे़ याविषयी अधिक माहिती अशी की, शिधापत्रिकाधारकांना करण्यात आलेल्या रॉकेलच्या वाटपाबाबत शासन निर्णयानुसार शिधापत्रिकेवर नोंदी घेणे अनिवार्य असताना तालुक्यातील बहुतांश रॉकेल विक्रेते नोंदी घेत नाहीत़ तसेच शिधापत्रिका न दाखवताच रॉकेलची विक्री करतात़ शिधापत्रिकाधारकांना १ ते ४ लिटर पर्यंत रॉकेल वाटप केल्याच्या पावत्या लाभर्थ्यांना दिल्या जात नाहीत़ यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता मोतिराम काळे यांनी माहिती अधिकाराखाली डिसेंबर २०१३ मध्ये माहिती मागितली होती़ यावरून हा प्रकार पुढे आला आहे़ जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी याप्रकरणाची दखल घेत मुदखेडसह जिल्ह्यातील सर्व तहासीलदारांना त्यांच्या तालुक्यात लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेवर नोंदी घेवूनच रॉकेल वाटप करावे़ पात्र लाभार्थ्यांकडे शिधापत्रिका नसेल तर त्यांना शिधापत्रिकेची दुय्यम प्रत द्यावी, रॉकेल वाटपाबाबतची पावती शिधापत्रिकाधारकांना द्यावी, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी केल्या आहेत़ जिल्ह्यामध्ये ३६ अर्धघाऊक परवानाधारक व १५०४ किरकोळ, हॉकर्स केरोसीन परवानाधारक यांच्या दप्तरांची तपासणी करण्यात आलेली आहे़ यामध्ये दोषी आढळून आलेल्या १२३ केरोसीन परवानाधारक यांच्याकडून शासन निर्णयातील तरतुदीनुसार एकूण २ लाख ६७ हजार अनामत रक्कम जप्त करण्यात आलेली आहे़ नायगाव तालुक्यात दोषी आढळून आलेल्या १५ केरोसीन परवानाधारकांकडून ४५ हजार रूपये अनामत रक्कम जप्त करण्यात आली़ हदगाव तालुक्यातील दोन अर्धघाऊक केरोसीन परवानाधारकांचा परवाना रद्द करण्यात आला़ नायगाव तालुक्यातील औराळा येथील, नांदेड येथील एकाचा परवाना रद्द करण्यात आला़ त्यांच्याविरूद्ध वजिराबाद ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याचेही त्यांनी काळे यांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे़ (प्रतिनिधी)