नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २५ मेपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यात २६ मे रोजी नांदेड शहरातील नवा मोंढा मैदानावर होत असलेल्या सभेत ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा शंखनाद करतील. यासह माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने दाखविलेल्या शौर्याला या सभेच्या निमित्ताने सलाम करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली.
खासदार चव्हाण म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे भाजपकडून या निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह हे २५ मे रोजी नागपूरला येणार आहेत, तर २६ मे रोजी ते नांदेडला येणार आहेत. दुपारी दीड वाजता विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर मी पालकमंत्री असताना भूमिपूजन केलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण शाह यांच्या हस्ते होणार आहे. विद्युत नगर येथील खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करतील. दुपारी दोन वाजता नवा मोंढा मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला शंखनाद असे नाव देण्यात आले आहे. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र करण्याच्या पायाभरणीचा हा शंखनाद असणार आहे. नक्षलवाद निर्मूलनासाठी शाह यांनी उचललेल्या पावलांचा हा शंखनाद आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा हा शंखनाद आहे. त्याचबरोबर पहलगाममध्ये मृत्यू पावलेल्या निष्पाप पर्यटकांना आणि शहीद सैनिकांना अभिवादन करण्यात येणार आहे. सभेनंतर नाना-नानी पार्क येथील भाजपाच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता नवा मोंढा मैदानावर वाॅटर प्रुफ मंडप उभारण्यात येणार आहे, असेही खासदार चव्हाण म्हणाले. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, महागराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले, विजय गंभीरे यांची उपस्थिती होती.
पक्ष प्रवेश हा मुख्य हेतू नाहीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत काँग्रेसमधील अनेकजण भाजपत प्रवेश करणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहेत. त्यावर खा. चव्हाण म्हणाले, पक्ष प्रवेश हा सोहळ्याचा मुख्य हेतू नाही. कोणा-कोणाचे पक्ष प्रवेश होतील ते वेळेवर सांगू. निवडणुकीनंतर शाह हे पहिल्यांदाच नांदेडात येत आहेत, हे महत्त्वाचे आहे.
आयुक्तालयाच्या निर्णयाला स्थगिती नाहीनांदेडात महसूल आयुक्तालय झाले पाहिजे, अशी माझी सुरुवातीपासूनच भूमिका आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याबाबत निर्णयही झाला आहे. या निर्णयाला स्थगिती मिळाली नाही, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता नव्याने काही मंडळी आयुक्तालयासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला यश आल्यास मला आनंदच होईल, असा टोलाही चव्हाणांनी विरोधकांना लगावला.
नांदेडहून मुंबई आणि गोवा विमानसेवेसाठी प्रयत्ननांदेडहून आजघडीला पाच विमानसेवा सुरू आहेत. परंतु, मुंबई आणि गोवा विमानसेवा सुरू व्हाव्यात, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. रिलायन्सकडे असलेले हे विमानतळ एमआयडीसीच्या ताब्यात येण्यासाठी अनेक अडचणी आल्या. त्यामुळे विलंब लागला. आता एमआयडीसीकडून हे विमानतळ महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणकडे जाणार आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. त्यामुळे नक्कीच नांदेडला आणखी चांगल्या सुविधा मिळतील, असेही खा. चव्हाण म्हणाले.