आंबेडकरी समुदायाने भीमजयंती घरातच साजरी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:18 IST2021-04-09T04:18:22+5:302021-04-09T04:18:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : ऐन एप्रिल महिन्यातच कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. साधारणपणे प्रत्येक घरात ...

आंबेडकरी समुदायाने भीमजयंती घरातच साजरी करावी
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : ऐन एप्रिल महिन्यातच कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. साधारणपणे प्रत्येक घरात एक- दोन रुग्ण असल्याचे दिसून येत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूंचेही प्रमाण वाढत आहे. कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी आंबेडकरी समुदायाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती घरातच साजरी करावी, असे आवाहन धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले आहे.
ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र, खुरगाव नांदुसा येथे ते बोलत होते. यावेळी भदंत सत्यशील महाथेरो, भदंत पंय्याबोधी थेरो, भंते संघरत्न, भंते धम्मकीर्ती, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते संघमित्र, भंते सुमेध, भंते सुभद्र, भंते सदानंद, भंते सुनंद, भंते शीलभद्र, संस्थेचे सचिव प्राचार्य साहेबराव इंगोले, गंगाधर ढवळे, आप्पाराव नरवाडे, नागोराव नरवाडे आदी उपस्थित होते. पंय्याबोधी म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, यावेळीही भीमजयंती संबंधित बुद्धविहारासमोरील ध्वजारोहण फक्त पाच लोकांच्याच उपस्थितीत करुन आपापल्या घरीच गोडधोड खाऊन जयंती साजरी करावी. आंबेडकरी समाजाने आताची परिस्थिती लक्षात घेत, प्रशासनाला सहकार्य करावे, कोणीही रस्त्यावर येण्याचा अट्टाहास धरु नये, असेही ते म्हणाले.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातही नुकतीच बैठक घेण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार ३० एप्रिलपर्यंत जिल्हाभरात जमावबंदी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कोणतेही धार्मिक, राजकीय तथा सामाजिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. प्रशासनाचे पारित आदेश सर्व समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्यात यावेत तसेच सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, पोलीस स्थानक स्वाधीन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या संदर्भात संबंधितांच्या बैठका घेऊन शासनाचे तथा प्रशासनाचे आदेश सर्वांपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहनही पंय्याबोधी यांनी यावेळी केले.