- श्रीनिवास भोसलेनांदेड : महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, मित्रपक्षांची अक्षरशः दाणादाण उडाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराकडे बड्या नेत्यांनी पाठ फिरवलेली असतानाही राष्ट्रवादी (शरद पवार) आणि उद्धवसेनेला काही प्रमाणात यश मिळाले होते. त्यामुळे या निकालानंतर नांदेड महापालिकेवर या पक्षांचे लक्ष केंद्रित होईल, अशी अपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र प्रत्यक्षात तसे काहीही घडले नाही.
महाविकास आघाडीतील प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करत उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यापासून महापालिका निवडणुकीत फारकत घेतली. या निर्णयाचा थेट फटका या दोन पक्षांना बसला असून, त्यांना मोजक्याच जागांवर उमेदवार उभे करावे लागले आहेत. परिणामी, आघाडीचा गड मजबूत करण्याऐवजी आघाडीच कमकुवत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
एकूण ८१ महापालिकेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. उमेदवारी माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत महायुतीतील घटक पक्षांकडून युतीसाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी अनेक बैठका, चर्चा आणि समीकरणे मांडण्यात आली. मात्र शेवटी कुठलाच तोडगा निघू शकला नाही. परिणामी, महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीचेही चित्र विस्कळीत झाले आणि जवळपास सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरले. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांकडून आघाडी टिकवण्यासाठी फारसे ठोस प्रयत्न झाले नाहीत. काँग्रेस आणि वंचित मिळून ७२ जागा लढवत आहे.
उद्धवसेनेची भिस्त सध्या प्रामुख्याने निष्ठावंत आणि सच्च्या कार्यकर्त्याच्या भरवशावर उभी आहे. 'मशाल' घेतून ३० जण रिंगणात असून त्यांना पक्षाकडून किती ताकद मिळणार हे गरजेचे असून त्यावर विजयाची गणिते अवलंबून असणार आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी (शरद पवार) ला केवळ ५ उमेदवारांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे 'तुतारी'चा आवाज नांदेडच्या राजकारणात किती दूरपर्यंत घुमणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मर्यादित उमेदवारी, अपुरी तयारी, आघाडीतील फाटाफूट यामुळे पक्षाच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह आहे.
मनसे आणि उद्धव सेनेत मैत्रीपूर्ण लढतीमनसे आणि उद्धवसेना यांच्यातही अपेक्षित युती झाली नाही. दोन्ही पक्षांनी मैत्रिपूर्ण लढतीचा मार्ग स्वीकारल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. याचा फायदा नेमका कोणाला होणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार असले, तरी सध्या मात्र आघाडीच्या विस्कळीत नियोजनाचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे मनसेची शहरात फारशी ताकद नाही.
पालिकेत कार्यकर्त्यांनी यश खेचले, तरीही नेत्यांचे दुर्लक्षनगरपालिका निवडणुकीत पक्षाकडून पाठबळ मिळालेले नसतानाही जिल्ह्यात काँग्रेससह उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) ने चांगली कामगिरी केली. काँग्रेस- ४२, राष्ट्रवादी (श.प.) - ६ तर उद्धवसेनेचे १४ नगरसेवक निवडूण आले. किनवटला उद्धवसेनेचा नगराध्यक्ष झाला. कार्यकर्त्यांनी खेचून आणलेल्या या यशानंतर पक्षाच्या नेत्यांकडून महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ दिले जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु, कोणत्याही बड्या नेत्याने नांदेडात येवून आघाडीसाठी अथवा पूर्ण जागावर उमेदवार उभे करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले नाही. आता जे रिंगणात उतरलेत त्यांच्या प्रचारासह नेतृत्व म्हणून नेत्यांनी ताकद देण्याची गरज आहे.
Web Summary : Nanded's Maha Vikas Aghadi faces setbacks as allies contest independently in municipal elections. Congress aligned with VBA, isolating Shiv Sena (UBT) & NCP (Sharad Pawar), limiting their candidate numbers. Internal discord and lack of senior leadership support further weaken the alliance's prospects.
Web Summary : नांदेड़ में महा विकास अघाड़ी को झटका, सहयोगी दलों ने मनपा चुनाव स्वतंत्र रूप से लड़ा। कांग्रेस ने वीबीए के साथ गठबंधन किया, शिवसेना (यूबीटी) और एनसीपी (शरद पवार) अलग-थलग पड़े, जिससे उम्मीदवार सीमित हो गए। आंतरिक कलह और वरिष्ठ नेतृत्व के समर्थन की कमी से गठबंधन कमजोर हुआ।