माहुरातील पाचही रुग्णवाहिका आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:31 IST2018-06-03T00:31:31+5:302018-06-03T00:31:31+5:30
तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांतून प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना माहूरला रेफर केले जाते. त्या रुग्णांना आणणाऱ्या पाचही रुग्णवाहिका वयोवृद्ध झाल्याने रुग्णांना माहूरला येईपर्यंत मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. येथे आल्यानंतर ही वाहने दुकान थाटून बसत असल्याने दुर्घटना घडण्याआधी पाचही रुग्णवाहिका बदलण्याची मागणी होत आहे़

माहुरातील पाचही रुग्णवाहिका आजारी
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांतून प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना माहूरला रेफर केले जाते. त्या रुग्णांना आणणाऱ्या पाचही रुग्णवाहिका वयोवृद्ध झाल्याने रुग्णांना माहूरला येईपर्यंत मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. येथे आल्यानंतर ही वाहने दुकान थाटून बसत असल्याने दुर्घटना घडण्याआधी पाचही रुग्णवाहिका बदलण्याची मागणी होत आहे़
येथील ७५ टक्के नागरिक शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात़ गोरगरीब जनतेला वेळेवर व विनाशुल्क आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी तालुक्यातील आष्टा, वाईबाजार, सिंदखेड, वानोळा, ईवळेश्वर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले़ येथे प्राथमिक उपचाराचीच व्यवस्था असल्याने इमरजन्सी रुग्णांना दर्जेदार सेवा वेळेवर मिळावी, यासाठी पाचही ठिकाणी रुग्णवाहिका या नावाखाली पाच टाटा सुमो कंपनीच्या जुन्या कालमर्यादा संपलेल्या रुग्णवाहिका देण्यात आल्या़ या पाचही ठिकाणावरून माहूरला येण्यासाठी रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे माहूरला येईपर्यंत अनेक ठिकाणची वाहने दुकाने थाटत असल्याने अनेकवेळा रुग्णांना दुसºया वाहनाने माहूर गाठावे लागले.
मोठ्या प्रमाणात प्रसूतीचे रुग्ण रेफर होत असताना या पाचही गावांत अनेक वर्षांपासून मागणी असूनही प्रसूतीकक्षाची निर्मिती करण्यात आली नाही़ रेफर लेटर देण्यापुरते प्राथमिक आरोग्य केंद्र राहिले. प्रसूती रुग्ण सरळ माहूरला पाठविले जात असल्याने रुग्णांचा प्राथमिक आरोग्य सेवेतील विश्वास उडाला आहे़ त्यातल्या त्यात खिळखिळ्या रुग्णवाहिकांना रुग्णासाठी कुठल्याच सुविधा नाहीत़ उलट प्रसूतीच्या रुग्णांना आदळआपट करून आणण्यात येत असल्याने ‘पुन्हा याने प्रवास नको रे’ म्हणून हात जोडण्याची वेळ येते़
---
माहूरच्या ग्रामीण रुग्णालयापासून आष्टा १० कि़मी़, वाईबाजार १५ कि़मी़, सिंदखेड २५ कि़मी़, वानोळा २८ कि़मी़, ईवळेश्वर २० कि़मी़ अंतर असून या सर्व प्रा़आ़ केंद्रात दिवसभरात एक हजारांवर रुग्ण उपचार घेतात़ तर साथरोग काळात हा आकडा दोन हजारांवर जातो़ तर माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात मे महिन्यात ५०० रुग्णांची नोंद ओपीडीत झाली नाही़ तर प्रसूतीचे ४२ रुग्ण दाखल झाले असून यापैकी ६९ रुग्ण माहूरवरून यवतमाळ, पुसद व इतर ठिकाणी रेफर करण्याचा सल्ला दिला जातो़