नांदेड : महायुतीला जनकौल मिळूनदेखील सत्तास्थापनेसाठी अन् त्यानंतर मंत्री, खातेवाटपासाठीही मोठा विलंब लागला. शनिवारी खातेवाटपानंतर नांदेड जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्रकारांनी खातेवाटपाबाबत प्रतिक्रिया विचारली असता दादा भडकले अन् म्हणाले, ‘गप्प बसा रे.’ त्यावरून महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे, असे नाही.
लोकसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेला आत्मविश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना नडला आणि विधानसभेत महायुतीने बाजी मारली. विरोधकांना शंभरचा आकडादेखील पार करता आला नाही. महायुतीला मिळालेल्या भरघोस यशानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचे खलबते अनेक दिवस दिल्लीदरबारी चालली. तद्नंतर शिवसेना नेते एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री नाही तर किमान गृह खाते आपल्याकडे द्यावे, असा आग्रह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे धरला होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध खात्यांवरून महायुतीमध्ये बरेच दिवस खल चालला.
तद्नंतर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी मंत्रिमंडळाचे खातेवाटप करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह, ऊर्जा, जीएडी अशी महत्वाची खाती त्यांच्याकडे ठेवली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास, एमएसआरडीसी आणि गृहनिर्माण तर अजित पवार यांना वित्त-नियोजन आणि उत्पादन शुल्क हे खाते देण्यात आले; परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अपेक्षित खाती मिळाली नाहीत. त्यामुळे काहीजणांनी पक्षश्रेष्ठींकडे नाराजीदेखील व्यक्त केली. खातेवाटपावरून महायुतीमधील नेत्यांमध्येदेखील मतभेद असल्याची चर्चा आहे. शनिवारी नांदेड जिल्हा दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी विमानतळावर गाठले. यावेळी खातेवाटपाबाबत दादांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ‘गप्प बसा रे,’एवढेच उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी उशीर होत असल्याचे सांगत पत्रकारांशी संवाद न साधताच विमानतळामध्ये प्रवेश केला.