लोकमत न्यूज नेटवर्क
माहूर : माहूर शहरात सुरू असलेली सर्व कामे ही अंदाजपत्रकामध्ये नमूद केल्यानुसारच योग्य दर्जाची होत असून, या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या सर्व साहित्याचे नमुने सक्षम प्रयोगशाळेत पाठवून त्याचे अहवाल मागविण्यात आले होते. हे सर्व अहवाल समाधानकारक असल्याने व शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकरणाकडून त्रयस्थ तांत्रिक तपासणी करूनच देयके अदा केली जात असल्याने प्रभाग क्रमांक एकमधील कामे योग्य दर्जाची होत असल्याची माहिती माहूर नगर पंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी नीलेश सुंकेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रभाग क्रमांक एकमध्ये सुरू असलेले सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ते तत्काळ बंद करून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता गुणनियंत्रण विभाग, नांदेड यांच्या देखरेखीखाली थर्ड पार्टी आॅडिट करावे, अशी तक्रार दिनांक २८ रोजी माहूर नगर पंचायतीच्या एका महिला नगरसेवकांनी केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी पत्रकारांनी प्रभारी मुख्याधिकारी नीलेश सुंकेवार यांची भेट घेऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली असता, मुख्याधिकारी यांनी ही कामे शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या दहा कोटी रुपयांच्या निधीमधून घेण्यात आली आहेत. या कामांना सक्षम प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता, शासनाची प्रशासकीय मान्यता व आवश्यक असलेल्या सर्व मान्यता घेऊन सुरू करण्यात आलेली आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने नगर अभियंता प्रतीक नाईक यांच्याकडून अहवाल मागवला होता. त्या अहवालाच्या अनुषंगाने कामाबाबतचे अभिलेख पाहिले असता, सर्व कामे योग्य दर्जाची व नियमांनुसार होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी केलेली तक्रार ही कामाच्याबाबतीत गैरसमज झाल्यामुळे केलेली असावी. त्यामुळे ही तक्रार ही निकाली काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तक्रार देणाऱ्यांचा हेतू स्पष्ट झाला असून, मुख्याधिकारी यांच्याकडून तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, नांदेड यांना कळविण्यात आले आहे, हे विशेष.