किनवट : आदिलाबाद ते नांदेड अशी दररोज धावणारी इंटरसिटी शनिवारी चार तासांहून अधिक उशिराने धावली. उशिरा धावल्याने ही इंटरसिटी मुदखेड रेल्वेस्थानकापर्यंत सोडण्यात आली. नांदेडला जाणाऱ्या प्रवाशांना मुदखेड येथून गाडी बदलण्याची वेळ आल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. इंटरसिटी रोजच उशिराने धावत असल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. या समस्येकडे कोणीही लक्ष देईना, त्यामुळे या मार्गाला कोणी वाली नसल्याचे प्रवासी बोलत आहेत.
तिरुपती ते आदिलाबाद कृष्णा एक्स्प्रेसला कनेक्ट येथील इंटरसिटी आहे. कृष्णा एक्स्प्रेसला विलंब झाला तर आदिलाबाद ते नांदेड इंटरसिटी विलंबाने धावते. मात्र, हे एक दिवसाचे नसून नित्याचे झाले आहे. जेवढा विलंब तेवढा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण सकाळी ८:४५ वाजता किनवट स्थानकावरून सुटणारी इंटरसिटी सकाळी दही ते साडेदहा, अकरा वाजता सुटली तर ती मालटेकडीपर्यंत सोडण्यात येते. त्यापेक्षा जास्त उशीर झाला तर मुदखेडपर्यंत सोडण्यात येते. असे असले तरी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन स्पेशल इंटरसिटी सोडण्याच्या मानसिकतेत नाही. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आदिलाबाद- किनवट- हिमायतनगर- भोकर या मार्गाला कोणी वाली नाही, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
शनिवारी इंटरसिटी मुदखेडपर्यंत जाणार असल्याने व त्या मागूनच मुंबईसाठी धावणारी नंदिग्राम एक्स्प्रेस अवघ्या दहा मिनिटांत असल्याने नांदेडला जाणाऱ्या बहुतांश प्रवाशांनी इंटरसिटीऐवजी नंदिग्रामने जाणे पसंद केले.