आरोपीचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:19 IST2021-04-28T04:19:13+5:302021-04-28T04:19:13+5:30
बसफेऱ्या घटल्या माहूर : येथील बसस्थानकातून किनवट व अन्य ठिकाणी जाणाऱ्या बसफेऱ्या घटल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली. ...

आरोपीचा जामीन फेटाळला
बसफेऱ्या घटल्या
माहूर : येथील बसस्थानकातून किनवट व अन्य ठिकाणी जाणाऱ्या बसफेऱ्या घटल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली. अनेक प्रवासी ताटकळलेले दिसत आहेत. औरंगाबाद, नागपूर, बीड, अमरावती जाणाऱ्या बसेस वाईमार्गे जातात. दुसरीकडे आदिलाबाद आगाराने याच मार्गाने बसफेऱ्या वाढवून प्रवासी वाहतुकीचा मोठा भार उचलला.
शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
किनवट : किनवट तालुक्यातील शिवणी परिसरातील शेतकरी सोयाबिन कपाशी, तूर आदी पारंपरिक व नगदी पिके घेत आहेत. यावर्षी उन्हाळी हंगामात ज्वारीचा पेरा वाढला. अनेक शेतकरी ज्वारी पिकाकडे वळले. परिसरातील अनेक शेतीत उन्हाळी ज्वारीचे पीक बहरले आहे. ज्वारीचे पीक शेतकऱ्यांना जगण्याचे बळ देत आहे.
बरबड्याची यात्रा रद्द
नायगाव : तालुक्यातील बरबडा येथे हनुमान जयंतीच्या दिवशी पोचम्मा मंदिर परिसरात भरणारी यात्रा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली. यात्रेनिमित्त होणारी उलाढाल थांबल्यामुळे अनेकांना त्याचा फटका बसला.
लसीकरणाला प्रतिसाद
लोहा : तालुक्यातील कापसी बु. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत ३ हजार ७९१नागरिकांना लस देण्यात आली. आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. मुनेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी याकामी परिश्रम घेतले. ४५ वर्षे झालेल्या नागरिकांनी आणि १ मे पासून १८ वर्षांच्या वर असणाऱ्या सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मुनेश्वर यांनी केले आहे.
नदीत बुडून मृत्यू
हदगाव : तालुक्यातील आडा शिवारात कयाधू नदीत बुडून सालगडी धम्मपाल मोतीराम मनोहर (२५) यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. धम्मपाल हे म्हशी चारण्यासाठी गेले होते. त्यांच्या नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली आहे.
अभाविपच्यावतीने रक्तदान
नांदेड : महावीर जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने रक्तदान शिबिर व प्लाझ्मा दान अभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी वैभव देऊलवार, अक्षय ठाकूर, शुभम देशमाने, गणेश दोडके आदी उपस्थित होते. १ मे पूर्वी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनी रक्तदान करून घ्यावे. कारण लस घेतल्यानंतर किमान ६० दिवस रक्तदान करता येणार नाही. त्या दरम्यान रक्ताची गरज पडल्यास अडचण निर्माण होऊ शकते. तुम्ही दान केलेला प्लाझ्मा कोरोना रुग्णासाठी वरदान ठरू शकतो असेही अभाविपच्यावतीने नमूद करण्यात आले.
माळाकोळीला कोविड सेंटर उभारा
लोहा : हॉटस्पॉट ठरलेल्या माळाकोळी येथे कोविड सेंटर उभारण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी प्रहारचे तालुकाध्यक्ष माऊली गीते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. माळाकोळी परिसरात ४० ते ५० खेडी, वाडी, तांडे आहेत. त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांसाठी विलगीकरण कक्षाची गरज आहे. माळाकोळीमध्ये आतापर्यंत ३९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. २० ते २२ जणांचा मृत्यू झाला. अनेकांना हैदराबाद, औरंगाबाद, लातूर नांदेड, लोहा, उदगीर, पुणे येथे जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत.
हदगावला रक्तदान शिबिर
हदगाव : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने हदगाव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ४० जणांनी रक्तदान केले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, मुख्याधिकारी जाधव, वैद्यकीय अधीक्षक ढगे, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. देवराव पाटील, तालुकाध्यक्ष वसंतराव देशमुख, ॲड. सचिन जाधव, अमोल कदम, राजू पाटील, नवनाथ पाटील आदी उपस्थित होते.
दहा आसन खुर्च्या समर्पित
नांदेड : पावडेवाडी येथील स्वातंत्र्यसैनिक विठाबाई पावडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मुलांनी तेरवीचा कार्यक्रम रद्द करून गावातील स्मशानभूमीसाठी ११ आसन खुर्च्या समर्पित केल्या आहेत. आसन खुर्च्यांची गरज होती. ही गरज आता संपली आहे. स्मशानभूमीत लाईट, पाणी, बांधकाम, सापळा व इतर सुविधाही उपलब्ध आहेत.
प्रत्येक प्रभागात केंद्र हवे
कंधार : शहरातील प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र चालू करा, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष ॲड. गंगाप्रसाद यन्नावार यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे. १८ वर्षांवरील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होणार आहे. यामुळे कोरोनाचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. म्हणून प्रत्येक विभागात लसीकरण केंद्र चालू करावे, याची माहिती नागरिकांना द्यावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.