नांदेड लोकसभेसाठी ५९ उमेदवारांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:35 AM2019-03-27T00:35:18+5:302019-03-27T00:35:44+5:30

नांदेड लोकसभेसाठी ५९ उमेदवारांनी ९४ अर्ज दाखल केले असून २६ मार्च रोजी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २४ उमेदवारांनी ३७ अर्ज दाखल केले आहेत. लोकसभा निवडणुकीत १४७ उमेदवारांनी ३०० अर्ज नेले होते.

59 candidates for Nanded Lok Sabha seats | नांदेड लोकसभेसाठी ५९ उमेदवारांचे अर्ज

नांदेड लोकसभेसाठी ५९ उमेदवारांचे अर्ज

Next

नांदेड : नांदेड लोकसभेसाठी ५९ उमेदवारांनी ९४ अर्ज दाखल केले असून २६ मार्च रोजी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २४ उमेदवारांनी ३७ अर्ज दाखल केले आहेत. लोकसभा निवडणुकीत १४७ उमेदवारांनी ३०० अर्ज नेले होते.
नांदेड लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. १९ ते २६ मार्चपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत ५९ उमेदवारांनी ९४ अर्ज भरले आहेत. यामध्ये सर्वाधिक ४१ अर्ज २५ मार्च रोजी भरले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी २४ उमेदवारांनी ३७ अर्ज तर १९ मार्च रोजी २, २० मार्च रोजी ६ आणि २२ मार्च रोजी ८ अर्ज प्राप्त झाले होते.
लोकसभेच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत १९ मार्च रोजी ५१ उमेदवारांनी ९३ अर्ज नेले होते. २० मार्च रोजी २८ उमेदवारांनी ५१ अर्ज, २२ मार्च रोजी ३६ उमेदवारांनी ९६ अर्ज, २५ मार्च रोजी २६ उमेदवारांनी ५१ अर्ज आणि २६ मार्च रोजी ६ उमेदवारांनी ९ अर्ज नेले होते. नांदेड लोकसभेसाठी भरलेल्या प्रमुख अर्जामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे, समाजवादी पक्षाचे अब्दुल समद, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे श्रीकांत गायकवाड आदींचा समावेश आहे.
आज होणार अर्जांची छाननी
लोकसभा निवडणुकीत प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची २७ मार्च रोजी छाननी होणार आहे. या छाननीला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे प्रारंभ होईल. २९ मार्च रोजी दुपारी तीन वाजेपर्यत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. २९ मार्च रोजीच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार शिल्लक राहतील हे स्पष्ट होणार आहे.
तळेगावकर बंडखोरीच्या पवित्र्यात
नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे डॉ. महेश तळेगावकर यांनी २६ मार्च रोजी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. भाजपाने पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून भाजपा विचारधारेशी बांधिलकी नसलेल्या व केवळ सत्तेच्या लालसेपोटी पक्षात ऐनवेळी आलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याचे म्हटले आहे. महापालिका निवडणुकीत याच धोरणाचा पक्षाला फटका बसला होता असेही त्यांनी नमूद केले आहे.मागील निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराने मोदीच्या विरोधात प्रचार केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: 59 candidates for Nanded Lok Sabha seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.