४७ हजार जणांना पहिल्या टप्प्यात मिळेल कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 07:01 PM2020-10-15T19:01:11+5:302020-10-15T19:02:24+5:30

corona vaccine news लस उपलब्ध झाल्यानंतर तिचे वितरण तसेच साठवणूक करण्यासाठीची यंत्रणा कितपत आहे याचा आढावा आता आरोग्य विभागातर्फे घेतला जात आहे.

47,000 people will get corona vaccine in the first phase in Nanded | ४७ हजार जणांना पहिल्या टप्प्यात मिळेल कोरोना लस

४७ हजार जणांना पहिल्या टप्प्यात मिळेल कोरोना लस

Next
ठळक मुद्देहायरिस्क असलेले जिल्ह्यात ४३ हजार रुग्ण२६ लाख ९७ हजार ५३४ लोकसंख्येचे सर्वेक्षण

- विशाल सोनटक्के

नांदेड : कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर ती सर्वात अगोदर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना देण्यात येणार असून त्यानंतर गंभीर आजारी रुग्णांना ती देण्याचा प्रयत्न राहील, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ४ हजार आरोग्य कर्मचारी आणि ४३ हजार हायरिस्क असलेल्या रुग्णांना पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातच ही लस मिळू शकते. 

भारतात सध्या ३ कोविड लसींची चाचणी प्रक्रिया विविध टप्प्यांत सुरू आहे.  लस उपलब्ध झाल्यानंतर तिचे वितरण तसेच साठवणूक करण्यासाठीची यंत्रणा कितपत आहे याचा आढावा आता आरोग्य विभागातर्फे घेतला जात आहे. दुसरीकडे उपलब्ध झालेली लस पहिल्या टप्प्यात कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता असतानाच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ही लस सर्वात अगोदर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना मिळेल. त्यानंतर ती वयोवृद्ध आणि गंभीर आजाराशी लढणा-या रुग्णांना देण्यात येईल, असे सांगत त्यानंतर लसीच्या उपलब्धतेनुसार ती सर्वांना देण्याचे प्रयत्न राहतील, असे स्पष्ट केले आहे. 

याच पद्धतीने लस देण्याचे नियोजन ठरल्यास नांदेड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालय आदी ठिकाणी कार्यरत असलेल्या सुमारे ४ हजारांवर आरोग्य कर्मचारी आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सर्वेक्षणात जिल्हाभरात आढळलेले कॅन्सर, किडनी, मधुमेह, हृदयविकार, यकृत आदी जंतूविरहित व्याधी असलेल्या ४३ हजार १६१ रुग्णांना प्राधान्याने ही लस उपलब्ध होऊ शकते. 

पहिल्या फेरीत ३६९ कोरोनाबाधित निष्पन्न
या अभियानांतर्गत प्रत्येकी तीन जणांच्या एकूण ६५२ टीमने म्हणजेच सुमारे २ हजार जणांनी ४ लाख ८८ हजार ८७३ जणांच्या घरी जावून आरोग्यविषयक माहिती घेतली. यामध्ये २ हजार ४५७ जण सर्दी, ताप तसेच इतर लक्षणे असलेले आढळू आले तर ५५६ जणांची ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी दिसली. लक्षणे आढळलेल्यांची तपासणी केली असता ३६९ नागरिक कोविडबाधित निष्पन्न झाले. त्यांना उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. 

२६ लाख ९७ हजार ५३४ लोकसंख्येचे सर्वेक्षण
जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या  अभियानाच्या दुस-या टप्प्याला जिल्हाभरात प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात ४ लाख ८९ हजार ४७९ कुटुंबांपैकी ४ लाख ८८ हजार ८७३ कुटुंबांपर्यंत आरोग्य कर्मचारी तसेच स्वयंसेवकांची टीम पोहोचली. या टीमने २६ लाख ९७ हजार ५३४ लोकसंख्येचे सर्वेक्षण केले. यामध्ये विविध गंभीर आजाराने त्रस्त असलेले ४३ हजार १६१ नागरिक जिल्हाभरात आढळले आहेत. 
- शिवशक्ती पवार, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: 47,000 people will get corona vaccine in the first phase in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.