मुखेडातील ४१ शाळा बंद होण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: June 2, 2014 01:04 IST2014-06-02T00:57:51+5:302014-06-02T01:04:13+5:30
मुखेड : मुखेड तालुक्यातील जि़प़च्या ४१ शाळा व खाजगी २ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत़

मुखेडातील ४१ शाळा बंद होण्याच्या मार्गावर
मुखेड : शिक्षण विभागाने तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा युडायसमध्ये निर्धारित केल्याप्रमाणे चौकशीअंती बंद करून त्या शाळेतील विद्यार्थी १ कि़मी़ अंतरावर असलेल्या शाळेत समायोजन करण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, पुणे यांना सर्व शिक्षण अधिकार्यांना दिले असून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्यामुळे मुखेड तालुक्यातील जि़प़च्या ४१ शाळा व खाजगी २ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत़ यामुळे जि़ प़ चे ८२ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत़ मुखेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २२६ प्राथमिक शाळा व ६ माध्यमिक शाळा आहेत़ यासाठी ७७४ प्राथमिक शिक्षक, ५२ प्राथमिक पदवीधर शिक्षक व ५४ पदोन्नत मुख्याध्यापक आहेत़ तालुक्यातील जि़ प़ च्या शाळेची सद्यस्थिती सर्वसाधारण असून २३२ पैकी १९१ शाळेतील विद्यार्थीसंख्या बर्यापैकी आहे़ तालुक्यात वाडी-तांड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून वाडी-तांड्यावरील लोक खरीप हंगाम संपल्यानंतर उदरनिर्वाहासाठी आठ महिन्याकरिता परप्रांतात स्थलांतर होत असतात़ तर तांड्यावरील बंजारा समाज उसतोडीच्या कामाला जातो़ हे लोक मोलमजुरीसाठी जात असताना आपल्या पाल्यांनाही सोबत घेवून जातो़ तर काही मजूर आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी खाजगी संस्थेत दाखल देवून त्याच खाजगी संस्थेच्या वसतिगृहात ठेवून स्थलांतरित होत असतात़ यामुळे वाडी-तांड्यावरील जि़प़ शाळेतील विद्यार्थीसंख्या घटत चालली आहे़ शासनाने स्थलांतरित कुटुंबाच्या पाल्यांची शिक्षणाची सोय व्हावी व सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी स्थलांतरित होणार्या कुटुुंबाच्या पाल्यांसाठी गाव, वाडी, तांड्यावर हंगामी वसतिगृहाची सुरुवात केली़ मुखेड तालुक्यात ६४ हंगामी वसतिगृहांना मान्यता दिली़ सर्व शिक्षा अभियानातंर्गत मोफत गणवेश व पुस्तक वाटप सुरू केले़ तरी पण वाडी-तांड्यावरील शाळेतील विद्यार्थी संख्या घटत चालली आहे़ तालुक्यात दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ९ शाळा आहेत़ यात मानसिंगतांडा, देगावतांडा, भाटापूर (पक़ु़), मेघूतांडा, खुरानुरातांडा, तोंडारतांडा, रेखुतांडा, किसन तांडा असून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेले मुकुंदतांडा, दापका राजातांडा, यशवंतनगर, पळसवाडी, मांजरीतांडा, खोबातांडा, निमजगा तांडा, सोनपेठ वाडी, जयसू तांडा, होनानाईकतांडा,प्रभूतांडा, हरीचंद्रतांडा, तुपदाळ (बु़), उंद्रीतांडा, वाल्मिक वाडी, देवला तांडा, सकनूरतांडा, रामचंद्रतांडा, चिचणापल्ली तांडा, आंदेगाव वाडी, भासवाडी, रूपचंदतांडा, कासारवाडी, सीताराम नाईकतांडा, संगमवाडी, गवळेवाडी, गोपनरवाडी, कमलातांडा, सोनपेठवाडी तांडा, वसूरतांडा, वाधावारतांडा, सोसायटीतांडा आदी ४१ वाडी- तांड्यावरील जि़प़च्या कमी पटसंख्येमुळे बंद होणार असून मुक्रमाबाद येथील परिवर्तन विकास मूकबधीर हायस्कूल व चांडोळा येथील शिवाजी महाराज विद्यालय बंद करण्याचे आदेश शिक्षण विभागाने नुकतेच दिले आहेत़ १६ ते २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या वाडी- तांड्यांवरील शाळेची भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेवून त्या वाडीतांड्यांवरील परिसरात किती अंतरावर दुसरी शाळा आहे़ तसेच येथील शाळेवर भौतिक सुविधाबाबत सद्य:स्थितीत तेथे शाळेची आवश्यकता आहे का, सर्वेक्षणामुळे सदर शाळेची पटसंख्या वाढण्याची शक्यता जाणवते काय, या सर्व बाबींची आरटीई अॅक्ट २००९ नुसार चौकशी करण्यात येईल़ उपरोक्त बाबी स्वयंस्पष्ट अभिप्रायासह दोन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे व तसेच कमी पटसंख्या असलेल्या शाळेत वरील बाबी निश्चित नसल्यास प्रस्तुत शाळेचे १ ते ३ कि़मी़ अंतरावरील शाळेत विद्यार्थ्याचे समायोजन करता येते का, याबाबत चाचपणी सुरु आहे़ (वार्ताहर) याबाबत गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, याबाबतचे पत्र प्राप्त झाले असून १० पेक्षा कमी पटसंख्या असणार्या शाळा बंद करणार असून २० पेक्षा कमी पटसंख्या असणार्या शाळांची पटसंख्या वाढते का याचा सर्वे करून पटसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करणार असून शक्य न झाल्यास त्याही शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना परिसरातील १ ते ३ कि़मी़ अंतरावरील शाळेत समायोजन करणार असल्याचे सांगितले़