कंधार तालुक्यात कुष्ठरोगाचे ४०७ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 19:59 IST2018-10-15T19:59:01+5:302018-10-15T19:59:38+5:30
शहरासह ग्रामीण भागात पंतप्रधान प्रगती योजनेतंर्गत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली.

कंधार तालुक्यात कुष्ठरोगाचे ४०७ रुग्ण
कंधार (जि. नांदेड) : शहरासह ग्रामीण भागात पंतप्रधान प्रगती योजनेतंर्गत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. यात १ लाख ९० हजार ३६४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात कुष्ठरोगाचे ४०७ संशयित रूग्ण आढळल्याचे समोर आले आहे.
तालुक्यात २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर या कालावधीत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. ग्रामीण भागातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी.ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी, कुष्ठरोग तंत्रज्ञ यांच्या सहकार्याने आशा, पुरुष स्वंयसेवक आदींनी मोहीम राबविली. विविध पथकांनी घरभेटी देऊन तपासणी केली.
बारूळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३१ हजार २१२ लोकसंख्येची तपासणी केली. त्यात ८४ संशयित रूग्ण आढळून आले. उस्माननगर केंद्रांतर्गत ३२ हजार ७३२ पैकी ९७ संशयित रूग्ण आढळले. पेठवडज अंतर्गत ३८ हजार ६६९ लोकसंख्येत ६४ संशयित, कुरूळा ३९ हजार १७ लोकसंख्येतून ५१ संशयित आणि पानशेवडी प्रा.आ. केंद्रांतर्गत ४३ हजार ९७४ तपासणी केलेल्या लोकसंख्येतून ८८ संशयित रूग्ण आढळून आले.
रासेयोचे योगदान
शहरात श्री. शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.जी.आर.पगडे, उपप्राचार्य प्रा.भागवत राऊत, कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. माधव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयोचे मुले व मुली स्वंयसेवक म्हणून कुष्ठरोग शोध मोहिमेसाठी सहभागी झाले होते. मुले-मुली घरभेट देऊन या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले़ वैद्यकीय अधीक्षक डॉ.जीवनराव पावडे, पर्यवेक्षक राजेंद्र वाघमारे, आशिष भोळे यांच्या सूचनेनुसार ४ हजार ७६० लोकसंख्येची तपासणी करण्यात आली. त्यात २३ रूग्ण संशयित कुष्ठरोगी आढळले.