रस्त्याच्या कामासाठी ४० कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:18 IST2021-04-27T04:18:16+5:302021-04-27T04:18:16+5:30
मारतळा येथील शाळेस प्रमाणपत्र लोहा - तालुक्यातील मारतळा येथील केंद्रीय शाळेस वृक्षमित्र फाउंडेशनकडून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिक्षक रवि ...

रस्त्याच्या कामासाठी ४० कोटी मंजूर
मारतळा येथील शाळेस प्रमाणपत्र
लोहा - तालुक्यातील मारतळा येथील केंद्रीय शाळेस वृक्षमित्र फाउंडेशनकडून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिक्षक रवि ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली ५वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील झाडांवर पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय केली. यात तेलाच्या रिकाम्या पिप्यात पक्ष्यांसाठी अन्न व पाणी ठेवण्यात आले. त्यामुळे पक्ष्यांची गैरसोय थांबली आहे. या उपक्रमाची वृक्षमित्र फाउंडेशन गोकुळनगरने दखल घेतली.
घरोघरी संपर्कावर भर
हदगाव - तालुक्यातील कंजारा येथील ग्रामपंचायतीचे पुढारी घरोघरी जाऊन लसीकरणाची माहिती लोकांना देऊन लोकांच्या मनातील लसीकरणाची भीती दूर करीत आहेत. सरपंच प्रदीप पाटील यांनी याकामी पुढाकार घेतला. यासाठी उपसरपंच अश्विनी कदम, सदस्य स्वप्निल रामगीरवार, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती हळदे, इंदुबाई शेळके, शोभा देवरे, शारदाबाई शेळके, मोनूताई बरडे आदी प्रयत्नशील आहेत.
पाटोदा येथे कोरोनाचा फैलाव
नायगाव - तालुक्यातील पाटोदा येथे कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. तहसीलदार गजानन शिंदे यांनी बैठक घेऊन प्रतिबंधिक क्षेत्रात कडक नियम लावण्याचा निर्णय घेतला. पाटोदा ग्रामपंचायतीने गाव व रस्ते सील केले आहेत. यावेळी हरीश शिंदे, ग्रामसेवक सूर्यवंशी, तलाठी शिंगनवाड, सदस्य विठ्ठल गोडगेवाड उपस्थित होते.
जिवे मारण्याचा प्रयत्न
हदगाव - शेतातील विद्युत पंपाच्या स्टार्टरमध्ये करंट सोडून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मनुला ता.हदगाव येथे घडली. शेतकरी संतोष जाधव हे नेहमीप्रमाणे शेतात गेले असता, स्टार्टरमध्ये केबल पडून संपूर्ण डब्याला करंट सोडला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर जाधव यांनी गावकऱ्यांना माहिती दिली. या संदर्भात कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
योग शिबिराला सुरुवात
फुलवळ - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योगशिक्षक नीळकंठ मोरे यांनी दररोज सकाळी ५.३० वाजता गुगल मीटद्वारे ऑनलाइन योग शिबिराचे आयोजन केले आहे. जवळपास ८० योगसाधक व त्यांच्या घरातील ३०० जण योग वर्गाशी जुळले आहेत. मोरे हे पानशेवडी येथील संत नामदेव महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत.
मुंडेवाडी नावालाच कंटेन्मेंट झोन
फुलवळ - एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, तहसील प्रशासन कंटेन्मेंट झोन जाहीर करीत आहे. मुंडेवाडीलाही कंटेन्मेंट झोन आहे. मात्र, तो नावालाच असल्याचे दिसून येते. आम्हाला सुविधा पुरविणार कोण, असा सवाल सरपंच ज्ञानोबा मुंडे यांनी केला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावात आरोग्य सुविधा, उपचार, साधी तपासणीही झाली नसल्याचे मुंडे म्हणाले.
हणेगावातील दुकाने सील
देगलूर - तालुक्यातील हणेगाव येथील अत्यावश्यक सुविधा सोडून इतर दुकाने सील करण्यत आली. स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. सील तोडून कोणी दुकाने चालू केल्यास संबंधितांना ग्रामपंचायतीकडून १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल. गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
धर्माबादेत निर्जंतुकीकरण
धर्माबाद - बऱ्याच दिवसांनंतर धर्माबाद शहरात निर्जंतुकीकरण करूनच सुरुवात करण्यात आली. यापूर्वीचे मुख्याधिकारी देवरे असताना त्यांच्या काळात फवारणी झाली होती. त्यानंतर, कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात फवारणी झालीच नाही. लोकांच्या तक्रारीमुळे रविवारी मोहीम हाती घेण्यात आली. उर्वरित प्रभागात सोमवारी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आल्याचे पालिकेचे रुक्माजी मोगावार यांनी सांगितले.
ग्रामीण भागात प्रवेशबंदी
हदगाव - हदगाव तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गावप्रवेश बंदी करण्यात आली. या संदर्भात पंचायत, महसूल व इतर विभागाने कडक सूचना दिल्या आहेत. याउपवरही काही रिकामटेकडे बिनकामी फिरत असल्याचे दिसून येते.