३३० चालक - वाचकांचा रोज १२ हजार प्रवाशांशी संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST2021-02-24T04:19:33+5:302021-02-24T04:19:33+5:30

नांदेड विभागातील ९ आगारांपैकी सर्वाधिक प्रवासी वाहतूक करणारे आगार म्हणून नांदेड आगाराची ओळख आहे. येथून मुंबई, नागपूर, शेगाव, कोल्हापूर, ...

330 drivers - readers' daily contact with 12,000 passengers | ३३० चालक - वाचकांचा रोज १२ हजार प्रवाशांशी संपर्क

३३० चालक - वाचकांचा रोज १२ हजार प्रवाशांशी संपर्क

नांदेड विभागातील ९ आगारांपैकी सर्वाधिक प्रवासी वाहतूक करणारे आगार म्हणून नांदेड आगाराची ओळख आहे. येथून मुंबई, नागपूर, शेगाव, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, हैदराबाद, बुलढाणा आदी लांब पल्ल्यासाठी बसेस नियमितपणे धावतात. मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर परजिल्ह्यातील तसेच परराज्यातील प्रवाशांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी लालपरीच धावली. लॉकडाऊन काळात तसेच लॉकडाऊननंतर योग्य ती खबरदारी घेऊन महामंडळाने प्रवाशांची वाहतूक केली. परंतु, मागील दोन ते तीन महिन्यांपासून कोरोनाच्या अनुषंगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांची सर्वत्र पायमल्ली होताना दिसत आहे. त्यास एस. टी. महामंडळही अपवाद नाही. आजघडीला रुग्णसंख्या वाढत असताना कोरोना नियमांचे जसे मास्क वापरणे, दररोज एस. टी. सॅनिटायझिंग करणे, प्रवासी आणि चालक - वाचकांची ताप तपासणी करणे आवश्यक असतांना या सर्व बाबींकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

प्रवासी कुठून आलेला आहे आणि तो कोणाच्या संपर्कात होता, हे त्यालाच माहिती असते, अशा हजारो अनोळखी व्यक्तिंचा दररोज चालक - वाचकांशी संपर्क येतो. त्यातून त्याना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे किमान कर्मचारी आणि नियमितपणे फिल्डवर काम करणारे चालक - वाहक यांची दररोज तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच त्यांना मास्क, सॅनिटायझर प्रशासनाने पुरविणे आवश्यक आहे.

चौकट

दररोज १२ हजार प्रवाशांशी संपर्क

नांदेड आगारातून जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यात बससेवा उपलब्ध करून दिली आहे. आगारातून दररोज होणाऱ्या जवळपास सव्वाचारशे बसफेऱ्यांच्या माध्यमातून ३३० चालक - वाहकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष १२ हजारांहून अधिक प्रवाशांशी संपर्क येतो. त्यात बहुतांश प्रवासी हे विनामास्क असतात. मास्क वापरणारेही बरेच जण रुमालाचा वापर मास्क म्हणून करतात. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्वाधिक धोका हा चालक, वाहक यांनाच आहे.

तपासणीच नाही

लॉकडाऊननंतर बससेवा चालू करताना नियमितपणे प्रवासी तसेच चालक, वाचकांची नियमितपणे आरोग्य तपासणी केली जात होती. तसेच गाडीदेखील सॅनिटाईझ केली जायची. परंतु मागील दोन महिन्यांपासून कोणतीच तपासणी केली जात नाही.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना सर्व चालक, वाहक आणि कर्मचारी यांना दिल्या आहेत. तसेच विनामास्क बसमध्ये प्रवेश दिला जात नाही. सोशल डिस्टन्स आणि कोरोना नियमांचे पालन केले जात आहे.

- वर्षा येरेकर, आगारप्रमुख

कोरोनाच्या अनुषंगाने आम्ही आवश्यक त्या सर्व नियमांचे पालन करतो. परंतु प्रवाशांना सांगूनही अनेकवेळा मास्क वापरला जात नाही. प्रत्येकाने स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी जबाबदारी म्हणून कोरोना नियम पाळणे आवश्यक आहे.

-विजय जाधव, वाहक

कर्तव्यावर असताना बाहेरगावी जावेच लागते. बसमध्ये प्रवास करणारी प्रत्येक व्यक्ती अनोळखी असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता आम्ही मास्क वापरणे, ड्युटी करून घरी गेल्यानंतर अगोदर आंघोळ करणे आणि नंतरच घरातील व्यक्ती अथवा लहान मुलांच्या जवळ जातो.

- दिलीप कदम, चालक

मास्क, सॅनिटायझरवर शून्य खर्च

कोरोना आजार आला तेव्हा सुरुवातीला एस. टी. प्रशासनाने कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर दिले.

लॉकडाऊन काळात अनेक सेवाभावी संस्था आणि प्रशासकीय यंत्रणा यांनीही मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले.

आजघडीला चालक, वाहक याना मास्क, सॅनिटायझरची गरज असतांना कोणीही त्यांना सदर साहित्य पुरवित नाही. त्यांनाच ते खरेदी करावे लागत आहे.

परिणामी, महामंडळ आजघडीला तरी मास्क आणि सॅनिटायझर खरेदीवर शून्य रुपये खर्च करत आहे.

लसीकरण कधी?

हजारो प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या चालक, वाहक यांचा कोरोना योध्दा म्हणून अनेकांनी सन्मान केला. परंतु आजघडीला त्यांना लस कधी दिली जाणार याचे उत्तर कोणाकडेच नाही.

चालक, वाहक यांची जबाबदारी पाहता त्याना अगोदर कोरोना लस देणे गरजेची आहे. येणाऱ्या काळात रुग्णसंख्या वाढेल, असे चित्र असतानाही ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

चालक - १६५

वाहक - १६५

रोजच्या फेऱ्या ४२८

Web Title: 330 drivers - readers' daily contact with 12,000 passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.