३३ केव्ही उपकेंद्रांना मान्यता
By Admin | Updated: July 18, 2014 01:51 IST2014-07-18T00:26:45+5:302014-07-18T01:51:02+5:30
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील सिपोरा अंभोरा व भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे विशेष बाब म्हणून ३३ केव्ही उपकेंद्राला राज्यशासन उर्जा विभागाने मान्यता दिली आहे.

३३ केव्ही उपकेंद्रांना मान्यता
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील सिपोरा अंभोरा व भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे विशेष बाब म्हणून ३३ केव्ही उपकेंद्राला राज्यशासन उर्जा विभागाने मान्यता दिली आहे. प्रत्येकी १ कोटीपेक्षा जास्त निधीची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली. याची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण होऊन पुढील आठवड्यात काम सुरू करण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीला दिल्याचे आ. चंद्रकांत दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. वाढोणा तांडा व पिंपळगाव शेरमुलकी येथे प्रत्येकी एक ३३ केव्ही उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे.
या उपकेंद्रामुळे शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न सुटणार असून, विजेचा तुटवडा कमी करण्यासाठी नवीन १०० एमव्हीएचे जाफराबादसाठी ३६ व भोकरदन करिता ३४ रोहित्रे मंजूर झाली आहेत. तसेच सिंगल फेज योजनेला देखील प्राधान्य देण्यात येणार आहे.
आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आ. चंद्रकांत दानवे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे यांच्यावर श्रेय घेण्याचे आरोप केले. त्यांनी राज्य आणि केंद्र शासन यांच्याकडून येणाऱ्या निधीचा पहिला फरक समजून घ्यावा, श्रेय घ्यायचेच असेल तर केंद्राकडून विशेष निधी उपलब्ध करावा, असे आवाहन केले. वीज केंद्रामुळे परिसरातील विजेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे दानवे यावेळी म्हणाले. यावेळी तालुकाध्यक्ष सुधीर पाटील, माजी सभापती राजेश चव्हाण, शहराध्यक्ष शेख कौसर, दत्तू पंडित, रामभाऊ दुनगहू, फैसल चाऊस, सर्जेराव शिंदे, प्रकाश ताठे, रामेश्वर गावंदे, माणिकराव वायाळ, दादाराव सरवदे, उत्तम उगले, दिनकर महाराज अंभोरे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता तालेवार, सहाय्यक अभियंता संदीप सोनवणे यांची उपस्थिती होती.
(वार्ताहर)