नांदेड जिल्ह्यात भूजलपातळीत ३ मीटरने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:31 IST2018-02-10T00:30:57+5:302018-02-10T00:31:24+5:30
जिल्ह्यात यावर्षीच्या मोसमात सरासरीच्या ६० टक्के पर्जन्यवृष्टी झाली असली तरी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या जानेवारीअखेर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी चार तालुक्यांतील पाणीपातळीत २ ते ३ मीटरने घट झाल्याची चिंताजनक बाब उघडकीस आली आहे़ त्यामुळे यंदाचा उन्हाळा नांदेडकरांना जडच जाणार असल्याचे दिसून येत आहे़

नांदेड जिल्ह्यात भूजलपातळीत ३ मीटरने घट
गोविंद सरदेशपांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात यावर्षीच्या मोसमात सरासरीच्या ६० टक्के पर्जन्यवृष्टी झाली असली तरी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या जानेवारीअखेर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी चार तालुक्यांतील पाणीपातळीत २ ते ३ मीटरने घट झाल्याची चिंताजनक बाब उघडकीस आली आहे़ त्यामुळे यंदाचा उन्हाळा नांदेडकरांना जडच जाणार असल्याचे दिसून येत आहे़
तर १० तालुक्यांतील पाणीपातळी १ ते २ मीटरने घटली असून दोन तालुक्यांच्या पाणीपातळीत अल्पशी घट झाली असल्याची माहिती जानेवारीअखेर केलेल्या सर्वेक्षण अहवालावरुन निदर्शनास आली आहे. वर्ष २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात ३० सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत सरासरी ५७०.२६ मि़मी. पर्जन्यमान झाले असून ते एकूण वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या ६० टक्के इतके आहे. दरम्यान, ज्या तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले. अशा तालुक्यांत आतापासूनच त्याचे दुष्परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे़
जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये सप्टेंबरअखेर ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. तर १० तालुक्यांमध्ये २० ते २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तसेच एका तालुक्यामध्ये पर्जन्यमानात १० ते २० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.
विशेष म्हणजे, यंदा जिल्ह्यातील फक्त मुदखेड तालुक्यात ९० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
१३४ निरीक्षण विहिरींद्वारे भूजल पातळीची नोंद
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या वतीने १३४ निरीक्षण विहिरींद्वारे पाणलोटनिहाय भूजलपातळीची नोंद घेण्यात येते. त्या अनुषंगाने जानेवारीअखेरच्या अहवालानुसार जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील भूजल पातळीत मोठी घट झाल्याचे धक्कायदायक चित्र आहे.
जिल्ह्यातील मुखेड, माहूर, देगलूर व धर्माबाद या चार तालुक्यांतील भूजल पातळीत सर्वात जास्त म्हणजे २ ते ३ मीटरने घट झाली आहे. तर नांदेड, अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर, किनवट, भोकर, लोहा, कंधार, बिलोली आणि मुदखेड तालुक्यातील पाणीपातळीत १ ते २ मीटरने घट झाली आहे. तर नायगाव व उमरी तालुक्यातील पाणीपातळीत अल्पशी घट झाली असल्याचे भूजल सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे़
विशेष म्हणजे, किनवट व माहूर तालुक्यांत यावर्षीच्या मोसमात ५० टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान झाले असल्यामुळे या दोन तालुक्यांतील वाडी-तांड्यावर जानेवारीपासूनच पाणीटंचाईसदृश्य स्थिती जाणवत आहे. उन्हाळा सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी, भूजल पातळीत झपाट्याने होत असलेली घट ही नक्कीच चिंताजनक आहे.
येत्या काही दिवसांत भूजलपातळीत आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक भागात पुढील काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाने पुढील दिवसांतील संभाव्य पाणीटंचाईचा धोका ओळखून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
यंदा विष्णूपुरीच्या वरच्या भागात चांगला पाऊस झाल्यामुळे प्रकल्प तीन वेळेस शंभर टक्के भरला होता़ त्यामुळे दरवाजे उघडून अनेकवेळा पाणी सोडावे लागले़ यंदा शेतकºयांसाठीही पाणीपाळ्या सोडल्या़ उन्हाळ्यासाठी प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे़