विधानसभानिहाय मतमोजणीच्या २४ फेर्‍या

By Admin | Updated: May 14, 2014 01:16 IST2014-05-14T00:01:27+5:302014-05-14T01:16:21+5:30

नांदेड लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली़

24 rounds of legislative vote counting | विधानसभानिहाय मतमोजणीच्या २४ फेर्‍या

विधानसभानिहाय मतमोजणीच्या २४ फेर्‍या

नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली़ जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या २० ते २४ फेर्‍या प्रत्येकी १४ टेबलवर होणार आहेत़ शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजच्या माहिती तंत्रज्ञान इमारतीत १६ मे रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे़ पहिल्यांदा टपाली मतदानाची मोजणी होणार आहेत़ जिल्ह्यात एकूण ५ हजार ३२९ टपाली मतपत्रिकांपैकी ३ हजार १३१ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहे़ त्यात मतदान कर्मचार्‍यांना एकूण दिलेल्या ४ हजार ५४३ मतपत्रिकेपैकी ३ हजार २५० मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत़ तर सैनिकांसाठीच्या ७८६ मतपत्रिकेपैकी ३५ मतपत्रिका प्राप्त झाल्या़ १६ मे रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत टपाली मतपत्रिकांची मोजणी होणार आहे़ मतमोजणीसाठी ६२९ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ त्यात १०२ मतमोजणी पर्यवेक्षक, १०२ मतमोजणी सहायक, १२५ सूक्ष्म निरीक्षक आणि ३०० इतर कर्मचार्‍यांचा समावेश आहे़ माहिती तंत्रज्ञान इमारतीच्या तळमजल्यावर भोकर, नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण मतदारसंघात झालेल्या मतदानाची मोजणी होईल़ तर पहिल्या मजल्यावर नायगाव, देगलूर आणि मुखेड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होईल़ प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल राहणार आहेत़ प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहायक आणि एक सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत़ मतमोजणी प्रक्रियेत पूर्ण झालेल्या फेरीनिहाय मतदानाची माहिती लाऊडस्पीकरद्वारे घोषित करण्यात येणार आहे़ हे लाऊडस्पीकर लॉ कॉलेज, नवा मोंढ्याकडील रस्त्यावर, आनंदनगर रस्त्याकडे जाणार्‍या बाजूस आणि महात्मा फुले शाळा येथे लावण्यात येणार आहेत़ तसेच एफ एम रेडिओवरही मतमोजणीची माहिती प्रसारित करण्यात येणार असून स्थानिक केबल वाहिनीवरही स्ट्रीपद्वारे मतांची संख्या प्रसारित करण्यात येईल़ या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़ पोलिस अधीक्षकांसह २ अतिरिक्त पोलिस अधीक्षक, २० पोलिस निरीक्षक, ३० पोलिस उपनिरीक्षक, ५०० पोलिस कर्मचारी यासह केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहे़ मतमोजणी केंद्रावर मोबाईल, कॅमेरा घेवून जाण्यास मनाई असल्याचेही धीरजकुमार यांनी सांगितले़ यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जनसंपर्क अधिकारी शशिमोहन नंदा आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)

Web Title: 24 rounds of legislative vote counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.