जिल्ह्यात एप्रिलअखेर डेंग्यूचे १९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST2021-05-16T04:16:53+5:302021-05-16T04:16:53+5:30
डेंग्यू ताप आजार विशिष्ट विषाणूमुळे होतो. या आजाराचा प्रसार ‘एडिस इजिप्टाय’ नावाच्या डासाच्या मादीमार्फत होताे. या डासाची उत्पत्ती स्वच्छ ...

जिल्ह्यात एप्रिलअखेर डेंग्यूचे १९ रुग्ण
डेंग्यू ताप आजार विशिष्ट विषाणूमुळे होतो. या आजाराचा प्रसार ‘एडिस इजिप्टाय’ नावाच्या डासाच्या मादीमार्फत होताे. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठून राहिलेल्या पाण्यात होते. सिमेंट टाक्या, रांजण, प्लॉस्टिकच्या रिकाम्या बादल्या, नारळाच्या करवंट्या, घरातील शौभेच्या कुंड्या, निरुपयोगी वस्तू, टायर्स व कुलर आदीत जास्त दिवस साठवलेल्या ठिकाणी एडिस इजिप्टाय डासाची मादी अंडी घालते. एक डास एकावेळी १५० ते २०० अंडी घालतो व यातून डासांचा मोठा फैलाव होतो.
डेंग्यू ताप आजारात रुग्णाला २ ते ७ दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोकेदुखी, सांधेदुखी, स्नायुदुखी असा त्रास होतो. रुग्णाला उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजूस दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाका-तोंडातून रक्तस्त्राव होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे ही लक्षणे दिसून येतात.
दरम्यान, गत दीड वर्षापासून सर्वजण कोरोना महामारीला तोंड देत असून, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी याविरोधात लढत आहेत. या कठीण प्रसंगी आरोग्य विभागातील कर्मचारी काेरोना आजारासोबतच डेंग्यू आजारावरसुद्धा नियमित प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहेत. डासांची उत्पत्ती कमी करणे व नियंत्रणात ठेवणे, यासाठी सरकारी आरोग्य यंत्रणा कामाला लागलेली आहे. परंतु, लोकसहभागाशिवाय या आजारावर नियंत्रण शक्य नाही.
नांदेड जिल्ह्यात एप्रिल २०२१ अखेर ५३ नागरिकांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी १९ रुग्णांना डेंग्यू ताप आजार असल्याचे निष्पन्न झाले. मागील तीन वर्षांत एकाही रुग्णाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची नोंद नाही.