तामसा यात्रेतील १५० क्विंटल भाजी अन् ५० क्विंटलच्या भाकरीच्या महाप्रसादाला अमृताची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 05:57 PM2020-01-16T17:57:02+5:302020-01-16T18:20:46+5:30

मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र बारा ज्योतिर्लिंग यात्रेसाठी बुधवारपासूनच हजारो भाविक तामशात दाखल झाले आहेत.

150 quintal's dish and 50 quintal's of bhakari's prasad in Tamasa Fair. Thousands of devotees took the taste | तामसा यात्रेतील १५० क्विंटल भाजी अन् ५० क्विंटलच्या भाकरीच्या महाप्रसादाला अमृताची गोडी

तामसा यात्रेतील १५० क्विंटल भाजी अन् ५० क्विंटलच्या भाकरीच्या महाप्रसादाला अमृताची गोडी

Next
ठळक मुद्देबारालिंगचे शिवालय प्राचीन हेमाडपंती दरवर्षी भाविकांची ही महापंगत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पार पडते़तामसा यात्रेला १०० वर्षाची परंपरा

- सुनील चौरे
हदगाव (जि़नांदेड) : हदगाव तालुक्यातील तामसा येथे श्रीक्षेत्र बारा ज्योतिर्लिंग देवस्थानात गुरुवारी झालेल्या भाजी भाकरीच्या महापंगतीत १५० क्विंटल भाजी अन् ५० क्विंटलच्या भाकरीचा स्वाद हजारो भाविकांनी घेतला. भाविकांच्या गर्दीमुळे तामसा परिसर फुलून गेला होता़ तामस्यातील या महापंगतीला १०० हुन अधिक वर्षाची परंपरा आहे़ 

मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच करीदिनी गुरुवारी ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली़ मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या या श्रीक्षेत्र बारा ज्योतिर्लिंग यात्रेसाठी बुधवारपासूनच हजारो भाविक तामशात दाखल झाले होते़ मकरसंक्रांतीला वेगवेगळ्या रंगाची भाजी, फळे यांचे वाण करुन खाण्याची व मित्रांना तीळगुळासह देण्याची प्रथा आहे़ त्याच धर्तीवर ही भाजी-भाकरी पंगत घेण्यात येते़ बारा ज्योतिर्लिंग असलेल्या महादेवाच्या पिंडीला गुरुवारी सकाळी अभिषेक झाल्यानंतर दुपारी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर उपस्थित हजारो भाविकांना प्रसाद वाटपास सुरुवात झाली. 

या महापंगतीसाठी देवस्थानच्या वतीने १५० क्विंटची भाजी करण्यात आली होती. या भाजीच्या तयारीसाठी मागील आठवडाभरापासून  भाज्या निवडणे, स्वच्छ करणे आदी तयारी केली जात होती़ गावापासून जवळ माळरानावर असलेल्या या मंदीरात तामस्यासह परिसरातील महिला-पुरुष एकत्रित येवुन लिंब, चिंचेसह इतर झाडांचा पाला जो मनुष्याच्या अपायकारक नाही़ एकत्रित करतात यामध्ये वाण म्हणून बोर, अवळा, ऊस, केळी, पेरू टाकले जातात. तर इतर भाज्यामध्ये गोबीपत्ता, वांगी, भेंडी, पालक, गवार, मुळगा आदींचा समावेश आहे. यात्रेसाठी नांदेडसह हिंगोली, परभणी, पुणे, यवतमाळ, निजामाबाद आदी ठिकाणाहून भाविक तामस्यामध्ये दाखल झाले होते़ या भाजी भाकरी महापंगतीसाठी बारा ज्योतिर्लिंग समितीचे अध्यक्ष संतोष निलावार, प्रदीप बंडेवार, अनंता भोपले, दिगंबर महाजन, रमेश घंटलवार, विजय लाभशेटवार, रवी बंडेवार, अनंत घंटलवार, दिलीप बास्टेवाड, बालाजी महाजन आदींनी परीश्रम घेतले़  महापंगतीच्यानिमित्ताने तामसा ग्रामस्थांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवुन सहकुटूंब या उपक्रमाचा आनंद घेतला़

बारालिंगचे शिवालय प्राचीन हेमाडपंती
शरीरासाठी आरोग्यशास्त्रनुसार उपयुक्त असलेल्या फळेभाज्या, पालेभाज्या, कंदमुळे यांना खेड्यातील मराठी माणूस अनन्यसाधारण महत्त्व देतो. सर्व प्रकारची जीवनसत्त्वे व प्रथिने असलेला कसदार भाजीपाला येथे भाजीसाठी वापरला जातो. येथील बारालिंगचे शिवालय प्राचीन हेमाडपंती आहे.  मुख्य पिंड ही जमिनीपासून भूगर्भात अंदाजे दहा फूट खोल आहे. मंदिरात  उजव्या बाजूला बारा पिंडी आहेत. यामुळेच येथे बारालिंग हे नाव प्रचलित असावे. याच ठिकाणी दरवर्षी भाविकांची ही महापंगत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पार पडते़

अशी आहे अख्यायीका
भोकर तालुक्यामध्ये सीताखांडी गावा आहे़ या ठिकाणी रामसीता थांबल्याचे अख्यायिका सांगितली जाते़ या जोडीचा या भागात मुक्काम पडला़ या मुक्कामात राम-सीता यांनी परिसरातील झाडांचा पाला खावुन दिवस काढला़ तेंव्हापासून त्यांना मदत करणाऱ्या मंडळींनीही झाड-पाल्याची भाजी करण्याची प्रथा सुरु केल्याची या महापंगती मागील आख्यायीका असल्याचे बळीराम पवार (कोळगाव) या भाविकाने सांगितले़

Web Title: 150 quintal's dish and 50 quintal's of bhakari's prasad in Tamasa Fair. Thousands of devotees took the taste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.