एस.टी.त १५ टक्के उपस्थितीची ऐशीतैशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:17 IST2021-05-13T04:17:45+5:302021-05-13T04:17:45+5:30
नांदेड बसस्थानकात एरवी प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. जिल्ह्यातील १६ तालुक्यांसह परजिल्हे व परप्रांतांत मोठ्या संख्येने बससेवा सुरू असते. ...

एस.टी.त १५ टक्के उपस्थितीची ऐशीतैशी
नांदेड बसस्थानकात एरवी प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. जिल्ह्यातील १६ तालुक्यांसह परजिल्हे व परप्रांतांत मोठ्या संख्येने बससेवा सुरू असते. त्यामुळे नांदेड बसस्थानकात बसगाड्या व प्रवाशांची मोठी लगबग असते. मात्र मागील दोन महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे एस.टी.ची चाके थांबली आहेत. बसस्थानकात शुकशुकाट असून मोजक्याच गाड्या सोडण्यात येत आहेत. जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू असल्याने सुरुवातीला १५ टक्के कर्मचारी उपस्थिती होती. मात्र एखाद्या दिवशी प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बसगाड्या सोडण्यात येत आहेत. त्यासाठी ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आढळून आली.
चौकट-
चालक, वाहक महिनाभरापासून घरी
राज्य शासनाने संचारबंदी लागू केल्यानंतर अत्यावश्यक सेवा म्हणून बसचा वापर करण्याचे आदेश दिले. मात्र जिल्ह्यातील कोरोनाचा कहर लक्षात घेऊन अनेक भागांत बसगाड्या धावल्या नाहीत. कोरोनामुळे वाढलेली रुग्णसंख्या व मृत्युदर पाहून नागरिक घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे बसने प्रवास करण्यास कोणीही तयार नव्हते; परंतु मागील काही दिवसांपासून कोरोनाचा चढता आलेख आता खाली उतरत आहे. तसेच कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहेत. त्यामुळे नागरिक आता एस.टी.ने जात-येत आहेत. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊनच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे नियोजन केले जात आहे. मात्र मागील महिन्यात चालक-वाहक घरी बसूनच होते.
चौकट-
राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेसाठी बसचा वापर करण्यासाठी परवानगी दिली असली तरी प्रशासनाच्या प्रवासासाठी घालून दिलेल्या नियम व अटी पाहून प्रवासी बससेवेकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे.
- शंकर कांबळे, वाहक
चौकट-
सध्या १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आदेशानुसार चालक व वाहक कर्तव्यासाठी हजर राहत आहेत. मात्र बसगाड्यांची संख्या वाढविण्यात आल्यामुळे त्यानुसार नियोजन करावे लागत आहे. त्यामुळे सध्या ५० टक्के उपस्थिती आहे.
- राजू कांबळे, एस.टी. कर्मचारी