जिल्ह्यातील सीबीएसई बारावीचे १ हजार २०० विद्यार्थी परीक्षा न देताच झाले पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST2021-06-04T04:15:12+5:302021-06-04T04:15:12+5:30
कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्राला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. २०२० मध्ये पहिली ते नववीच्या परीक्षा ...

जिल्ह्यातील सीबीएसई बारावीचे १ हजार २०० विद्यार्थी परीक्षा न देताच झाले पास
कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्राला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. २०२० मध्ये पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढलेली रुग्णसंख्या व मृत्यूची संख्या लक्षात घेऊन दहावी व बारावीच्या परीक्षासंदर्भात शासन कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे नियोजित परीक्षेचे वेळापत्रक रद्द करण्यात आले होते. देशभरात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएसई बोर्डाने यापूर्वी दहावीची परीक्षादेखील रद्द केली आहे. याच धर्तीवर राज्याच्या शिक्षण विभागाने सुद्धा दहावीची परीक्षा रद्द केली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाचा धोका अद्याप कमी झाला नाही. त्यामुळे यावर्षीच्या सीबीएसई बारावीची परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. मुलांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देत या काळात परीक्षेचा ताण देणे उचित ठरणार नसल्याने बारावीचा निकाल निश्चित केलेल्या कालावधीत योग्य पद्धतीने मूल्यमापनाच्या आधारे जाहीर केला जाणार आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील बारावीचे सीबीएसईचे १ हजार २०० विद्यार्थी परीक्षा न देताच पास झाले आहेत.
चौकट-
सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्राने घेतल्यामुळे जिल्ह्यातील सीबीएसई बारावीचे १ हजार २०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचा निकाल निश्चित केलेल्या कालावधीत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर होणार आहे. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, नांदेड
चौकट-
सध्याच्या काळात बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अवघड बाब होती. त्यामुळे परीक्षा रद्द करणे योग्यच होते. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर परिश्रम घेतले होते. त्यांचे नुकसान झाले आहे.
-प्रा. धाराशिव शिराळे, शिक्षणतज्ज्ञ, नांदेड.
चौकट-
कोरोनामुळे वर्षभर असेच गेले. त्यात ऑनलाइन शिक्षण दिल्यामुळे अभ्यासक्रमही अपूर्णच होता. अनेक अडचणीनंतरही अभ्यास केला. मात्र, परीक्षा देण्याची मन:स्थिती नव्हती. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे परीक्षेचे टेन्शन होते. आता परीक्षा रद्द केल्यामुळे बरे वाटत आहे.
-आकाश कवडे, विद्यार्थी.
चौकट-
विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे बारावीनंतरचे वैद्यकीय, अभियांत्रिकी व अन्य पदवी शाखेचे प्रवेश कोणत्या निकषावर केले जाणार आहेत. हे अद्याप निश्चित नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला आहे.