दहावीची परीक्षा रद्द केली, परीक्षा शुल्क कधी परत करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST2021-05-17T04:15:56+5:302021-05-17T04:15:56+5:30
दहावीचे परीक्षा शुल्क ४१५ रुपये एवढे असून इंग्रजी शाळा व सेमी शाळेतील दहावीतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क अधिक आहे. दरम्यान, ...

दहावीची परीक्षा रद्द केली, परीक्षा शुल्क कधी परत करणार?
दहावीचे परीक्षा शुल्क ४१५ रुपये एवढे असून इंग्रजी शाळा व सेमी शाळेतील दहावीतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क अधिक आहे. दरम्यान, मागील वर्षी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात आले होते. तसेच अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क हे समाजकल्याण विभागाकडून परत केले जाते. २०२१मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षा शुल्क घेतल्यानंतर शासनाने या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क परत कधी करणार याकडे लक्ष लागले आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा विचार सुरू आहे, तर दहावीचे अंतर्गत मूल्यमापन कसे होईल, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकही गोंधळात सापडले आहेत. अद्याप कोणताही एक निर्णय होत नसल्याने हा गोंधळ वाढत चालला आहे.
पुढे काय होणार, विद्यार्थी संभ्रमात
चौकट- १. दहावीच्या परीक्षेची तयारी केल्यानंतर परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे ज्यांनी खूप तयारी केली होती, त्यांचे नुकसान झालेच आहे. दहावीचे मूल्यमापन कसे हाेणार याविषयी प्रतीक्षा आहे. - आकाश कवडे, विद्यार्थी.
२. अकरावी प्रवेशासाठी दहावीचे मार्क महत्त्वाचे असतात. आता आपल्या आवडत्या कोर्ससाठी प्रवेश घेताना कोणतीही अडचण येऊ नये, ही अपेक्षा आहे, अन्यथा विद्यार्थ्यांवर अन्याय होइल. - सिद्धांत बुक्तरे, विद्यार्थी.
३. दहावीचे परीक्षा फार्म भरताना आम्ही ४१५ रुपये प्रवेश शुल्क भरले आहेत. परीक्षाच होणार नसल्याने आता आमची परीक्षा शुल्क परत करावी. शासनाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता परीक्षा शुल्क परत करण्याचे आदेश द्यावेत. - राजेश कांबळे, विद्यार्थी.
शिक्षणाधिकारी म्हणतात.
चौकट- दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भातही शासनच निर्णय घेईल. त्यानंतर माध्यमिक मंडळ त्याची अंमलबजावणी करेल. अद्याप यासंदर्भात कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी.