जि.प. चा लाखोंचा महसूल बुडतोय
By Admin | Updated: April 20, 2017 02:50 IST2017-04-20T02:50:24+5:302017-04-20T02:50:24+5:30
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आठवडी बाजाराचे लिलाव पंचायत विभागाने गेल्या वर्षीच्या लिलाव रकमेपेक्षा कमी फरकाने केले.

जि.प. चा लाखोंचा महसूल बुडतोय
कमी फरकाने झालेले बाजाराचे लिलाव पुन्हा करण्याची मागणी
नागपूर : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आठवडी बाजाराचे लिलाव पंचायत विभागाने गेल्या वर्षीच्या लिलाव रकमेपेक्षा कमी फरकाने केले. यासंदर्भात विनोद पाटील या सदस्याने आक्षेप घेतला. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या सर्कलमधील बाजाराचा पुन्हा लिलाव करण्याच्या निर्णय घेतला. बुधवारी ही लिलावाची प्रक्रिया पार पडली. यात जो बाजार १ लाख ०२ हजारात गेला होता, तोच बाजार पुनर्लिलावात २ लाख ११ हजारात गेला. असे जिल्ह्यातील १५ बाजाराचे लिलाव गेल्या वर्षीच्या लिलावापेक्षा कमी फरकाने झाले आहे. त्यामुळे जि.प. व ग्रा.पं. चा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. त्यामुळे कमी फरकाने गेलेल्या बाजाराचे लिलाव पुन्हा घ्यावेत अशी मागणी जि.प. सदस्यांकडून होत आहे.
जि.प. च्या मालकीचे जिल्ह्यात ३५ आठवडी बाजार आहे. या आठवडी बाजाराच्या लिलावातून जि.प.ला ७५ टक्के व स्थानिक ग्रामपंचायतला २५ टक्के उत्पन्न मिळते. २०१७-१८ साठी करण्यात आलेल्या लिलावातून ४९,९९,५०० रुपयांचा महसूल प्रशासनाला प्राप्त झाला. परंतु पंचायत विभागाने केलेले हे लिलाव दोषपूर्ण असल्याचा ठपका जिल्हा परिषदेच्या झालेल्या सभेत सदस्य विनोद पाटील यांनी ठेवला. त्यांनी घेतलेल्या माहितीत पंचायत विभागाने १५ बाजारांचे लिलाव गेल्या वर्षीच्या लिलावापेक्षा कमी फरकाने केल्याचा आरोप केला. नियमानुसार लिलाव हे गेल्या वर्षीपेक्षा जास्त रकमेने करणे आवश्यक आहे. परंतु पंचायत विभागाने केलेल्या लिलावात १,७०,००० रुपयांपर्यंत कमी रकमेत केले. यात कामठी तालुक्यातील वडोदा, चिचोली, सावनेर येथील भानेगाव , हिंगण्यातील कान्होलीबारा, रामटेक येथील मनसर, काचूरवाही, मौदा येथील अरोली , उमरेड येथील सिर्सी, सूरगाव, चांपा व भिवापुरातील नांद बाजाराचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.बाजार समितीच्या लिलावात घोळ झाल्याच्या आक्षेप घेतल्यावर प्रशासनाने विनोद पाटील यांच्या वडोदा येथील बाजाराचा फेरलिलाव घेतला. त्यात १ लाख ०९ हजाराची बढत मिळाली आहे. (प्रतिनिधी)
लाखो रुपयांचा महसूल मिळू शकतो
कमी फरकाने गेलेल्या बाजाराचे लिलाव पुन्हा घेतल्यास जि.प. ला लाखो रुपयांचा महसूल मिळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा सर्व बाजाराचे लिलाव घ्यावे. पंचायत विभागाने ठेकेदारांना लाभ पोहचविण्यासाठी मुद्दाम कमी रकमेचे लिलाव केले आहे.
- विनोद पाटील, सदस्य, जि.प.