आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचा गृहपाल जेरबंद
By Admin | Updated: December 16, 2015 03:17 IST2015-12-16T03:17:03+5:302015-12-16T03:17:03+5:30
वसतिगृहात मेस चालविणाऱ्या बचत गटाच्या महिला सचिवास ५० हजारांची लाच मागणाऱ्या लोकसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी सकाळी जेरबंद केले.

आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचा गृहपाल जेरबंद
५० हजारांची लाच स्वीकारली : एसीबीने बांधल्या मुसक्या
नागपूर : वसतिगृहात मेस चालविणाऱ्या बचत गटाच्या महिला सचिवास ५० हजारांची लाच मागणाऱ्या लोकसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी सकाळी जेरबंद केले. कैलास अरुण उईके (वय ३८) असे आरोपीचे नाव असून तो कळमन्यातील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात गृहपाल(वॉर्डन) म्हणून कार्यरत आहे.
त्याला एसीबीच्या कोठडीत पोहचविणाऱ्या महिलेचे नाव अपेक्षा उपरे असून, त्या महिला बचत गटाच्या सचिव आहेत. हा बचत गट आदिवासी मुलांच्या वसतिगृहात मेस चालवितो. त्याबाबतचे सप्टेंबर, आॅक्टोबरचे २०१५ च्या चार बिलांची रक्कम वसतिगृहाकडे थकीत होती. त्यातील तीन बिले आरोपी उईकेने काढून दिली.
चौथे बिल रोखत त्याने ५० हजारांची लाच मागितली. एकमुस्त ५० हजारांची लाच दिल्याशिवाय चौथे बिल काढून देणार नाही, अशी अडेलतट्टू भूमिका उईकेने घेतली होती. त्यामुळे उपरे यांनी एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांची भेट घेतली. त्यांनी तक्रार नोंदवून घेतल्यानंतर आरोपी उईकेच्या मुसक्या बांधण्यासाठी सापळा लावला.
मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास लाचेची ५० हजारांची रक्कम घेऊन उपरे वसतिगृहात गेल्या. बाजूला एसीबीचे पथक दबा धरून बसले. आरोपी उईकेने लाच स्वीकारताच पोलीस निरीक्षक युवराज पत्की, हवालदार दिलीप जाधव, शंकर कांबळे, महिला शिपाई कोमल गुजर यांनी त्याच्या मुसक्या बांधल्या.(प्रतिनिधी)